आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Govt. Declare Water Only For Drought Area

सरकारचा निर्णय: मध्य प्रदेश, कर्नाटकमधून दुष्काळी भागासाठी चारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेली तीन- चार वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने मराठवाड्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली अाहे. यावर्षी तर दुष्काळाचे चटके असह्य हाेत अाहेत. या परिस्थितीबाबत मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत सखाेल चर्चा झाली. त्यात दुष्काळग्रस्त भागासाठी उपाययोजना करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाच्या उपसमितीला देण्यात आला आहे. मध्य प्रदेश वा कर्नाटकमधून दुष्काळी भागातील जनावरांसाठी चारा अाणण्याची सरकारची याेजना असल्याची माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. दुसरीकडे, चारा छावण्या सुरू करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अाले अाहेत, असे महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी सांगितले.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीची माहिती देताना खडसे म्हणाले, वन विभाग, शेती विकास महामंडळ, कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांच्या हजारो हेक्टर जमिनींवर वैरण विकास कार्यक्रम राबविला जाणार असून दुष्काळी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि मागेल त्याच्या हाताला काम देण्याच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अाले अाहेत. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पिण्याचे पाणी देण्याकडे जास्त लक्ष दिले जाणार असून त्यासाठी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठीच राखीव ठेवला अाहे.

टँकरना जीपीअारएस
लातूर आणि उस्मानाबाद ग्रामीणमध्ये भीषण पाणीटंचाई अाहे. याठिकाणी रेल्वेने पाणी आणण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत केंद्राला पत्र लिहिले जाणार असून टँकरने पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ५० किलोमीटरची अट शिथील करण्यात आली असल्याने आता १०० किमीवरूनही पाणी आणणे शक्य होणार आहे. या टँकर्सना जीपीआरएस लावले जाईल, जेणेकरून पाणी योग्य ठिकाणी पोहोचत आहे की नाही याकडे लक्ष ठेवणे शक्य होणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

जनावरे भुकेली, चारा मात्र नाही
बीड : लहान जनावरे- २२५६५७, मोठी जनावरे- ५९६७०७, दैनंदिन चाऱ्याची गरज ४२५७ मे. टन , सध्या चारा उपलब्ध नाही
लातूर : लहान जनावरे- ४४९३२, मोठी जनावरे- ४५५२१८, दैनंदिन आवश्यकता ३१६६ मे. टन, सध्या चारा उपलब्ध नाही
उस्मानाबाद : लहान जनावरे- ३२५३३३, मोठी जनावरे- ४१२०१४, दैनंदिन चाऱ्याची आवश्यकता ३४४८ मे. टन, सध्या चारा उपलब्ध नाही

पशुखाद्य गुजरातमधून अाणू : लाेणीकर
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले, मराठवाड्यात फक्त सात टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १९ टक्के पाणी साठा होता. तीन वर्षे पाऊस न पडल्याने धरणे अजूनही तहानलेलीच अाहेत. गाळ साचल्याने नद्या मृत झाल्या आहेत. गाळ उपसण्याचे काम सुरु असून पाच वर्षांत ते काम पूर्ण होईल. पाणी पुरवण्याबाबत सरकार गंभीर आहे. दुष्काळी जिल्ह्यांमध्ये केवळ १५ दिवसच पुरेल इतका चारासाठा अाहे. त्यामुळे शेजारच्या राज्यांमधून चारा आणला जाणार असून गुरांसाठी पशुखाद्य गुजरातमधून आणण्याचा विचार करीत अाहाेत.’

उपसमितीच्या उपाययोजना
>> चाऱ्यासाठी वैरण विकास कार्यक्रम व्यापक करणार
>> शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रुपये मजुरी, मोफत बियाणे
>> मजुरीत वाढ करण्याची शिफारस
>> शेती विकास महामंडळ, कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडील हजारो हेक्टर जमिनीवर चारा उत्पादन करणार.
>> याकरिता प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य, बियाणे पुरवणार
>> उन्हाळ्यातील चाऱ्यासाठी वन विभागाच्या जमिनींवरील गवताची कुरणे राखीव ठेवणार
>> सुधारीत पद्धतीने चारा लागवडीसाठी हायड्रोफोनिक चारा निर्मिती यंत्राच्या खरेदीत ५० टक्के अनुदान