आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Govt Tie Up With New South Wales In Six Sectors

ऑस्ट्रेलियातील जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रयोग महाराष्ट्रात उपयुक्त ठरतील : मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र राज्य व ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यासोबत सहा क्षेत्रात झालेल्या सामंजस्य करारांच्या परस्पर सहकार्याच्या कागदपत्रांचे आज आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी झालेल्या करारामुळे दोन्ही राज्यातील कृषी, आरोग्य, उच्च व तंत्रशिक्षण, जलव्यवस्थापन आणि पुराण वस्तुसंग्रहालय या विभागातील योजना प्रभावीपणे राबविण्यात मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले. विशेषत: आस्ट्रेलियाचा न्यू साऊथ वेल्स प्रांत आणि महाराष्ट्र यांच्यातील भौगोलिक व पर्जन्य विषयक साम्यामुळे जलव्यवस्थापन आणि समन्यायी पाणी वाटप या क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग महाराष्ट्राला उपयुक्त ठरतील, असे ते म्हणाले.
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व न्यू साऊथ वेल्सचे प्रिमिअर बॅरी ओ फेरेल यांच्या उपस्थितीत या कागदपत्रांचे आदान-प्रदान करण्यात आले, यावेळी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव सुमित मलिक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाचे संचालक एस. मुखर्जी, ऑस्ट्रेलियाचे भारतातील वाणिज्य दूत मार्क पिअर सन्स, ऑस्ट्रेलियन न्यू साऊथ वेल्स कॅबिनेटचे महासंचालक क्रिस इसियल्स उस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जलसंपदा आणि कृषी क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करुन सिडनीमधील शेतीविषयक अत्याधुनिक माहिती राज्यातील शेतकऱ्यांना मिळाल्यास कृषी क्षेत्रातील संशोधनास चालना मिळेल. तसेच या करारामुळे मुलांचे लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार या संदर्भातील प्रकरणांमध्ये पोलीस व न्यायवैद्यक अधिकारी यांना अत्याधुनिक बाबींचे प्रशिक्षण मिळेल आणि आधुनिक मानसोपचार तंत्रज्ञान विकसित होण्यास मदत होईल. पाण्याचे समन्यायी वाटप, कालव्यांचे नियमन, पाणी हक्क इत्यादी क्षेत्राबरोबरच नदी पात्रालगतची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी ई- वॉटर सोर्स मेकॅनिझम, या करारामुळे उपयुक्त ठरणार आहे.
कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सौर ऊर्जा बाबत साऊथ वेल्स सोबत केलेल्या करारानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाच्या कामात युरोपिअन तज्ज्ञ व्यक्ती विशेष अभ्यास करणार असून या संशोधन कार्यातही त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक शुल्क न आकारता या तज्ज्ञ व्यक्ती आपल्या सेवा उपलब्ध करुन देणार आहेत.
राज्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेतील स्थानिक प्रतिनिधी सिडनी येथे जाऊन संसद कार्याविषयी माहिती घेणार आहेत तसेच सिडनीतील लोकप्रतिनिधी संसदीय कामकाजासंदर्भात राज्यास भेट देणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दोन राज्यातील परस्पर सामंजस्य व माहितीची देवाण घेवाण यामुळे न्यू साऊथ वेल्स व महाराष्ट्र राज्य यांच्यातील औद्योगिक संबंध वृध्दींगत होतील, असे न्यू साऊथ वेल्स प्रिमिअर बॅरी ओ फेरेल यांनी यावेळी सांगितले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव डॉ. मालिनी शंकर, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर उपस्थित होते.