आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra & India Need Nuclear Power Sharad Pawar

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची महाराष्ट्राला गरज, जनतेने पाठिंबा द्यावा- शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची महाराष्ट्रासह देशाला गरज आहे. त्यामुळे कोकणातील जनतेने या प्रकल्पाला पाठिंबा द्यावा. स्वस्तात आणि पुरेशी वीज हवी असेल तर अणुऊर्जा प्रकल्पच ती देऊ शकतात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे.
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा जोतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी पुष्पहार अर्पण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौ-यावर आहेत. मोदींनी तेथे राज्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला गती येण्यासाठी फ्रान्स सरकारसोबतच्या करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. यामुळे भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेना नाराज झाली आहे. आम्ही प्रकल्पाला विरोधच करू व हा प्रकल्प आम्ही मोदींच्या गुजरातमध्ये हलवावा अशी विनंती करणार असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी शरद पवारांना छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
पवार म्हणाले, भारत कृषिप्रधान व विकसनशील देश आहे. आपल्याकडे शेतीला मोठा वाव आहे. त्यामुळे शेतीच्या विकासासाठी कायमस्वरूपी वीजेची गरज असते. त्यासाठी स्वस्तात व मुबलक प्रमाणात वीज हवी असेल तर आजच्या काळात अणुऊर्जेला पर्याय नाही. तारापूरमधील अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला वीज पुरवत आहे. त्यामुळेच गरजेनुसार जैतापूरमधील प्रकल्पही आवश्यक आहे. अणुऊर्जेमुळे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जैतापूर प्रकल्पही इको-फ्रेंडली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. शिवसेनेचा विरोध अनाठायी असल्याचे सांगत सत्तेत राहून विरोध करणे योग्य नाही असा चिमटाही पवारांनी उद्धव ठाकरेंना काढला. भाजपने मित्रपक्षाला नीट समजून सांगितले पाहिजे असेही पवारांनी सांगितले.