आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Legislative Assembly News In Marathi, Congress, NCP, Divya Marathi

विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्‍यास सुरूवात, कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीची समन्वय समिती स्थापन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभेचे निकाल लागण्यास अजून 13 दिवसांचा अवधी असतानाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसने समन्वय समिती स्थापन केली असून रामदास आठवले यांनीही शनिवारी पदाधिका-यांची एक बैठक आयोजित केली होती. भाजपनेही उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरू केली आहे. मात्र, शिवसेना 16 तारखेनंतर चर्चा करणार असल्याचे समजते.

राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले, लोकसभा निवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेस उमेदवारांविरोधात काँग्रेस आमदारांनी केलेल्या छुप्या प्रचाराची राष्‍ट्रवादीने गंभीर दखल घेतली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना केलेल्या दग्याफटक्याचा बदला घेण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत हात दाखवण्याची रणनीती राष्‍ट्रवादीने आखली आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विधानसभेच्या तयारीसाठी एक समन्वय समिती स्थापन केली आहे. यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नारायण राणे, नितीन राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, भास्करराव जाधव, जयंत पाटील, डॉ, गुरुनाथ देसाई यांचा समावेश आहे. या समितीची बैठक 16 मेनंतर आयोजित करण्यात आली असल्याची माहितीही या नेत्याने दिली.

काँग्रेसने शनिवारी बैठक आयोजित करून विधानसभेची तयारी सुरू केली. प्रदेश काँग्रेसच्या वतीने 288 मतदारसंघात समन्वयक पाठवण्यात येणार आहेत. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीबरोबर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असून जागा वाटपाची चर्चा सुरू केली जाणार आहे.
रिपाइंला हव्यात 30 जागा
भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संभावित उमेदवारांच्या नावावर पक्षातील नेत्यांनी चर्चा सुरू केली असून 16 मे नंतर महायुतीच्या बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. रिपाइंनेही शनिवारी बैठक आयोजित करून जागा वाटपाबाबत चर्चा केली. रिपाइं या वेळी 30 जागा मागणार असल्याची माहिती अविनाश महातेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.