आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेच्या मैदानात सरळ लढती; गिरीशचंद्र व्यास बिनविरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून निवडून देण्यात येणाऱ्या राज्य विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार गिरीशचंद्र व्यास यांची नागपूर महापालिका मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली असून अहमदनगर वगळता सहा मतदारसंघात सरळ लढती होत आहेत. कोल्हापूर आणि मुंबईत मात्र काँग्रेसला बंडखोरांचा मोठा त्रास होणार आहे.

शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. त्यात नागपूरमध्ये गिरीशचंद्र व्यास (भाजप) वगळता सर्वांनी आपापली उमेदवारी मागे घेतल्यामुळे व्यास यांची बिनविरोध निवड झाली. अकोला-बुलडाणा-वाशीम मतदारसंघातील शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया व काँग्रेसचे रवींद्र सपकाळ वगळता इतर दोन अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे तेथे दोघांमध्ये सरळ लढत होत आहे.

अहमदनगरमध्ये आठ उमेदवारांपैकी अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस), शशिकांत गाडे (शिवसेना) आणि जयंत ससाणे, मच्छिंद्र सुपेकर यांना वगळता इतरांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे नगरमध्ये चौरंगी लढत होत आहे. सोलापूर मतदारसंघात दीपक आबा साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि प्रशांत परिचारक (अपक्ष) यांच्यात सरळ लढत होईल. आज तेथे काँग्रेसचे बंडखोर दिलीप माने, राहुल सावंत व विजय राऊत (सर्व अपक्ष) यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. धुळे-नंदुरबार मतदारसंघातील अमरीश पटेल (काँग्रेस) व डॉ. शशिकांत वाणी (भाजप) यांना सोडून सर्व उमेदवारांनी आपापली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या दोघांमध्ये तेथे सरळ लढत होईल.
कदम यांचा विजय पक्का
मुंबई मतदारसंघात शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे पर्यावरणमंत्री रामदास कदम पहिल्या फेरीतच निवडून येतील. युतीचे दुसरे उमेदवार भाजपचे मनोज कोटक यांची मनसेच्या २८ मतांवरच मदार होती. पण मनसेने आपली भूमिका जाहीर केली आणि कोटक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. आता दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप व अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांच्यात लढत आहे.
पाटलांची कसरत
कोल्हापूरमध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (काँग्रेस) आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महादेव महाडिक यांच्यात लढत होणार आहे. महाडिक अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा होती. इतर सर्व उमेदवारांनी आपापली उमेदवारी मागे घेतली. मात्र, महाडिक िरंगणात कायम आहेत. महाडिक यांना भाजपचा पाठिंबा असल्याचे कळते.