आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होऊ दे खर्च, बुडू दे राज्य; विरोधी पक्षाकडून अंतरिम अर्थसंकल्पाचे वाभाडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा बुधवारी विधान परिषदेत विरोधी सदस्यांनी कडक समाचार घेतला. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला असून अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे ‘होऊ दे खर्च, वाढू द्या कर्ज आणि बुडू दे महाराष्ट्र’ असे सरकारचे धोरण असल्याची टीकाही विरोधकांनी केली.

विरोधी पक्षनेते विनोद तावडे म्हणाले, सिंचन व वीज घोटाळ्याने राज्याला आघाडी सरकारने कर्जाच्या खाईत लोटले आहे. या सरकारने जनतेच्या माथ्यावर 3 लाख 478 हजार कोटींचे कर्ज मारले असून हे कर्ज फेडण्यासाठी राज्य सरकारने अजून कर्ज घेतले आहे. त्यामुळे भविष्यात राज्य आणखी कर्जाच्या खाईत जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

भाजपचे पांडुरंग फुंडकर यांनी राज्य सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. शेतकर्‍यांना रात्री वीज दिली जात असल्यामुळे त्यांना त्रास होत आहे. राज्यातील उद्योजकांना अशा प्रकारे वीज देण्याची सरकार हिंमत करेल काय, असे विचारत आघाडी सरकार शेतकर्‍यांचे आहे की भांडवलदारांचे? असा प्रश्न उपस्थित केला.