आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Lightens School Kids’ Burden, Sets Weight Limit For Bags.

पाठीवरील भार हलका होणार, दप्तराचे ओझे पहिलीला २, आठवीला ४ किलो!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शाळकरी मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधिमंडळात सादर केला. या अहवालात करण्यात आलेल्या शिफारशींप्रमाणे पहिलीत मुलांच्या दप्तरांचे ओझे हे दोन किलो आणि आठवीत शिकणाऱ्या मुलांच्या दप्तरांचे ओझे हे ४.२ किलोग्रॅमपेक्षा अधिक असू नये.
पहिलीतील मुलांचे सर्वसाधारण वजन हे २० किलो आणि आठवीतील मुलांचे ४२ किलोच्या दरम्यान असते. पालकांनी आणि शाळेतील मुख्याध्यापकांनी दप्तराचे ओझे पाल्याच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे ना, याची काळजी घ्यावी. आपल्या पाल्याचे वजन माहीत करून घ्यावे. यासाठी वह्या पुस्तकांचे वजन करून ते तपासून घ्यावे, अशा सूचना अहवालात करण्यात आल्या आहेत. दप्तराचे वजन कमी करण्यासाठी वह्यांची जाडी कमी करावी. त्यानंतरही १० टक्के वजन कमी न झाल्यास मुख्याध्यापकांसोबत चर्चा करून वेळापत्रकामध्ये दिलेल्या सूचनांची कार्यवाही करावी, अशा सूचनाही यात देण्यात आल्या आहेत.

गृहपाठाचे नियोजन करा आणि विषयनिहाय दिवस ठरवा
बॅग कमी वजनाची विकत घ्यावी, शाळांनी गृहपाठाचे नियोजन करावे, गृहपाठ तपासण्यासाठी विषयनिहाय दिवस ठरवावा, मात्र पहिली व दुसरीसाठी गृहपाठाच्या वह्यांची आवश्यकता नाही, तसेच शाळेत स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यामुळे मुलांना घरून पाणी आणण्याची गरज भासणार नाही, असेही समितीच्या िशफारशीत नमूद करण्यात अाले अाहे.

शाळेतच हवे ‘दप्तरालय’
शाळेत ई-लर्निंगचा वापर वाढवावा, सर्व मंडळानी ई-पुस्तके उपलब्ध करावी, कार्यानुभव, चित्रकला, संगणक, शारीरिक शिक्षण या विषयांच्या वह्या शाळेतच ठेवाव्यात. शाळांमध्ये ग्रंथालयांसारखे दप्तरालय सुरू करावे.

पालकांचीही जबाबदारी
विद्यार्थ्यांच्या शाळेशी निगडित साहित्य घरात एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी कपाट, रॅक, पेटी किंवा बॅग ठेवावी. दप्तरात त्या-त्या दिवशी लागणारेच साहित्य टाकावे. यासाठी आदल्या रात्री पालकांनी शाळेचे वेळापत्रक पाहावे; जेणेकरून अावश्यक तेवढ्याच वह्या-पुस्तके दप्तरात राहतील.

शारीरिक वाढही महत्त्वाची
शाळकरी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीबरोबर निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्त्वाचे असल्याने हे ओझे कमी करण्याच्या सूचना अभ्यास समितीने केल्या असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली. समितीच्या या शिफारशींबाबत राज्य सरकारकडून लवकर निर्णय अपेक्षित आहे.