आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेतील दहा आमदारांची नियुक्ती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त दहा आमदारांच्या जागा शनिवारी भरण्यात आल्या. काँग्रेसने आपल्या कोट्यातील सहापैकी चारच जागा भरल्या असून दोन जागा अजून रिक्त ठेवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपल्या सहाही जागा भरताना विभागीय, महिला तसेच सामाजिक अनुशेष भरून काढला आहे. एप्रिलपासून विधान परिषदेच्या 12 जागा रिक्त झाल्या होत्या. यातील प्रत्येकी सहा जागा दोन्ही काँग्रेसने वाटून घेतल्या होत्या. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून शुक्रवारी परवानगी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजभवनाकडे दहा जणांची यादी पाठवली आणि त्यावर राज्यपाल के. शंकरनारायण यांची मान्यता मिळाल्यानंतर नावांची घोषणा करण्यात आली.

काँग्रेसच्या चार आमदारांपैकी जनार्दन चांदूरकर हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असून ते पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी समजले जातात. मागासवर्गीय समाजातील चांदूरकर पेशाने वकील आहेत. रामहरी रूपनर सोलापूर धनगर समाजाचे कार्यकर्ते असून सातार्‍याचे आनंदराव पाटील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे सर्मथक समजले जातात. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असणार्‍या आनंदराव यांच्याकडे कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदही आहे. जैतापूरच्या हुस्नाबानू खलिपे या काँग्रेसच्या कार्यकर्त्या असून खासदार हुसेन दलवाई यांचे त्यांना सर्मथन आहे.

राष्ट्रवादीने आपला कोटा तत्काळ भरला असून राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष यांना पुन्हा एकदा आमदारकीची संधी मिळाली आहे. सांगलीतील धनगर समाजाचे कार्यकर्ते रामराव वडकुटे यांना आमदारकी देऊन विधानसभेसाठी राष्ट्रवादीने पायाभरणी केली आहे, तर शिवसेना सोडून आलेले, मात्र लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या राहुल नार्वेकरांना आमदारकीची बक्षिसी देण्यात आली.

राष्ट्रवादीच्या दलित सेलचे प्रमुख प्रकाश गजभिये यांनी नागपूर सोडून मुंबईत मुक्काम ठोकला होता. वरीष्ठ नेत्यांशी असलेला सतत संपर्क त्यांना फायदेशीर ठरला आहे. कल्याणचे जगन्नाथ शिंदे हे केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रमुख आहेत, तर ख्वाजा बेग हे यवतमाळचे आहेत.

काँग्रेसचे आमदार : जनार्दन चांदूरकर (मुंबई), रामहरी रूपनर (सोलापूर), आनंदराव पाटील (सातारा), हुस्नाबानू खलिपे (रत्नागिरी).
राष्ट्रवादीचे आमदार : विद्या चव्हाण (मुंबई), रामराव वडकुते (हिंगोली), राहुल नार्वेकर (मुंबई), प्रकाश गजभिये (नागपूर), जगन्नाथ शिंदे (कल्याण), ख्वाजा बेग (यवतमाळ).

जोगेंद्र कवाडेंवर अन्याय
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोंगेद्र कवाडेंना आमदारकी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले होते. लोकसभा निवडणुकीत कवाडेंच्या पार्टीने काँग्रेसला पाठिंबा दिला होता, तो आमदारकी व महामंडळांवर संधी देण्याच्या अटीवर. मात्र, काँग्रेसने हे आश्वासन न पाळल्याने कवाडे काँग्रेसवर खूप नाराज झाले आहेत.

गाडगीळ, डॉ. देसाई, तावडे, सावंतांना डावलले
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. गजानन देसाई, दिनकर तावडे व बप्पा सावंत यांना डावलण्यात आले आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावरही अन्याय झाला आहे.