आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra: MNS Workers Attack Toll Booths On Raj Thackeray\'s Order

टोल धोरणाच्या तोंडावर मनसेची राज्यात तोडफोड; राज ठाकरे यांचे तुडवा-तुडवीचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पुणे/नागपूर/नाशिक - मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टोलविरुद्ध ‘तुडवा-तुडवी’च्या भाषेत एल्गार पुकारताच राज्यभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर तोडफोड सुरू केली. रविवारी मध्यरात्री मुंबईत पेटलेल्या आंदोलनाचे लोण सोमवारी पुणे, नाशिक, नागपूर, नगरपर्यंत पोहोचले. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी टोलची नासधूस करण्यात आली. राज्याचे टोलधोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. या धोरणाआधीच राज यांनी हे आंदोलन पुकारले, हे विशेष.

मुंबईत दहिसर, खालापुरी, ऐरोली टोल नाक्यांवर आंदोलन झाले. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से, खालापूर, बावधन नाक्यावर आंदोलन झाले. नाशिक मार्गावर खेड येथेही संगणक फोडण्यात आले. सोलापूर मार्गावर मांजरी नाका फोडण्यात आला. नागपुरात अमरावती मार्गावरील दाभा नाक्यावर, तर नाशिक जिल्हय़ात भावडबारी घाटातील ‘राज इन्फ्रास्ट्रक्चर’च्या टोल नाक्यावर तोडफोड करण्यात आली.

टोल मागायला कुणी समोर आला तर त्याला तुडवा. रस्त्यांवर कितीही वाहने जमा झाली, वाहतूक जाम झाली तरी चालेल मात्र टोल भरायचा नाही. - राज ठाकरे, (नवी मुंबईत मनसे कार्यालय उद्घाटनप्रसंगी)

नुकसानभरपाई वसूल करणार
कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई होणारच. तोडफोड करणार्‍यांच्या पक्षाकडून नव्या कायद्यानुसार नुकसानभरपाई वसूली केली जाईल. यापूर्वी तोडफोड करणार्‍यांना अटक केली होती, त्यामुळे त्यांनी हिमतीची भाषा करू नये. लोकांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे.’ आर. आर. पाटील, गृहमंत्री

आलिशान गाड्यांवाले गरीब आहेत काय?
राज्यात 2.40 लाख कि.मी रस्ते खात्याकडे आहेत. सरकारकडे पैसे नसल्याने रस्ते खासगीकरणातून बांधावे लागतात. वेळ, पेट्रोल, डिझेल वाचणार्‍या पैशांतूनच टोल द्यायचा असतो. मात्र आलिशान गाड्यांवाले गरीब म्हणायचे काय? रस्ते खराब असतील, तर आम्हीच टोल बंद करू.’ छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री

टोल बंद पाडल्यास रस्ते बांधणे अशक्य
टोलवसुलीत पारदर्शकता नसेल तर लोक संतापणारच. पण वसुली बंद पाडली तर नवे रस्ते बांधणे अशक्य आहे. त्यामुळे वसुलीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा असायला हवी. लोकांच्या विरोधामुळे रस्ते बांधकामाचा खर्च राज्याला द्यावा लागेल. सद्य:स्थितीत राज्याकडे पैसा नाही. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

(फोटो : बीड-नगर महामार्गावरील आष्टी तालुक्यातील पांढरी येथील टोलनाका सोमवारी पहाटे तोडफोड करून जाळला. छायाचित्र : सचिन रानडे)