आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena MALs Wealth Increases Large Percent

आमदारांच्या संपत्तीवाढीत मनसे अव्वल, तर भाजपच्या लोढांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्याचे स्वप्न दाखवत राजकारणात उतरलेले राज ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राचे नवनिर्माण झाले की नाही हा वादाचा प्रश्न असला तरी त्यांच्या पक्षाचे व आमदारांचे मात्र ‘कल्याण’ झाल्याचे समोर आले आहे. २००९ मध्ये विजयी झालेल्या मनसेच्या आमदारांच्या संपत्तीत सुमारे ३०० टक्के वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. भाजपच्या उमेदवारांच्या संपत्तीत २०० टक्के, राष्ट्रवादीच्या १७६ टक्के, तर शिवसेना उमेदवारांच्या संपत्तीत १७२ टक्के वाढ झाल्याचेही स्पष्ट होत आहे.

२००९ मध्ये विजयी झालेले २१६ आमदार या वेळेस निवडणूक रिंगणात आहेत. मागील वेळच्या तुलनेत या उमेदवारांच्या संपत्तीत सरासरी ८.१७ कोटींची वाढ झाली असून ही वाढ सरासरी १६४ टक्के आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी राज्यातील सर्व उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेल्या मनसेच्या नेत्यांनी संपत्तीवाढीच्या बाबतीत सर्वच पक्षीयांना मागे टाकल्याचे यावरून दिसते. मनसेचे १३ पैकी आठ आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या संपत्तीची २९४ टक्के सरासरी वाढ झाल्याचे या अहवालातच म्हटले आहे.

लोढांची संपत्ती १३० कोटींनी वाढली
२००९ व २०१४ मधील उमेदवारांच्या संपत्तीचा तौलनिक अभ्यास केल्यावर भाजपचे उमेदवार व मुंबईतील मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना आमदारकी सर्वाधिक लाभदायक ठरल्याचे दिसते. २००९ मध्ये त्यांची संपत्ती ६८.६४ कोटी होती, तर २०१४ मध्ये ती १९८.६१ कोटींवर पोहोचली. त्यांच्यानंतर जळगावचे शिवसेना आमदार सुरेश जैन यांची संपत्ती २००९ मध्ये ८२.८२ कोटी होती, ती २०१४ मध्ये १८२.८४ कोटींवर पोहोचली. या यादीत तिसरा क्रमांक काँग्रेसचे मुंबईतील आमदार रमेशसिंह ठाकूर यांचा. त्यांची संपत्ती २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये ५९.४० कोटींनी वाढली.

साहेबराव पाटलांचीही ‘प्रगती’
मूळ संपत्ती सोडून संपत्तीवाढीची टक्केवारी पाहिली तर या यादीत जळगाव जिल्ह्यातील साहेबराव पाटील यांचा प्रथम क्रमांक लागतो. २००९ मध्ये पाटील यांची संपत्ती केवळ ९२ हजार होती. २०१४ च्या शपथपत्रात त्यांनी संपत्ती ५.११ कोटी असल्याचे दाखवले असून ही वाढ ५५ हजार ४४६ टक्के अशी सर्वाधिक आहे. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे कुर्ल्याचे आमदार मिलिंद कांबळे यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या संपत्तीत २८ हजार ५२८ टक्के वाढ झाली आहे. २००९ मध्ये त्यांनी केवळ २५ हजारांची संपत्ती दाखवली होती आणि ती आता तब्बल ७१ लाखांवर जाऊन पोहोचली आहे.

गोरंट्याल झाले ‘गरीब’
राज्यातील सहा आमदार तरी गेल्या पाच वर्षांत कागदोपत्री गरीब झाले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध शड्डू ठोकलेले विलासकाका उंडाळकर यांची संपत्ती २००९ मध्ये १६ कोटी होती होती, ती ११ कोटींनी घटून ५.८९ कोटींवर पोहोचली आहे. कळवणचे राष्ट्रवादीचे आमदार अर्जुन पवार यांची संपत्ती ७.५० कोटींहून ५ कोटींवर घटली आहे. निफाडचे शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांची संपत्ती सुमारे ६ कोटींहून ५ कोटींवर घसरली. मुखेडचे काँग्रेस आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर पाटील यांची संपत्तीही १.६४ कोटींहून केवळ ७५ लाखांवर पोहोचली आहे. जालन्यात कैलाससेठ म्हणून ओळखले जाणारे कैलास गोरंट्याल यांची संपत्ती गेल्या ५ वर्षात सुमारे ३० लाखांनी, तर माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची संपत्ती २००९ च्या तुलनेत ३० लाखांनी घटली आहे.

पक्षीय ‘कामगिरी’
भाजपच्या ४४ आमदारांची सरासरी संपत्ती २००९ मध्ये ४.४२ कोटी होती आणि २०१४ मध्ये ती सरासरी १४.६६ कोटींवर पोहोचली.
मनसेच्या ८ आमदारांची सरासरी संपत्ती २००९ मध्ये ३.४९ कोटी होती. ती आता १३.७५ कोटींवर पोहोचली. याचा अर्थ भाजप आमदारांच्या संपत्तीत पाच वर्षात सरासरी ५ कोटींची वाढ झाली तर मनसे आमदारांची संपत्ती सरासरी १० कोटींनी वाढली. काँग्रेसच्या ६२ आमदारांची संपत्तीची सरासरी २००९ मध्ये ४.४२ कोटी होती. ती आता १२.५४ कोटींवर पोहोचली. राष्ट्रवादी उमेदवारांच्या संपत्तीत ७ कोटींची तर शिवसेना उमेदवाराच्या संपत्तीत सुमारे ८ कोटींची सरासरी वाढ झाली आहे.

भाजपचा दुसरा, सेनेचा पाचवा
संपत्तीवाढीत भाजपचा १९८ टक्क्यांसह दुसरा क्रमांक लागताे. त्यांचे ४४ आमदार पुन्हा रिंगणात आहेत. काँग्रेसचे ६२ आमदार या वेळेसही लढत असून त्यांच्या संपत्तीची सरासरी वाढ ही १८४ % आहे. राष्ट्रवादीचा संपत्तीवाढीत चौथा क्रमांक आहे. या पक्षाचे ५१ आमदार मैदानात असून त्यांच्या संपत्तीत १७२ % वाढ झाली आहे, तर शिवसेनेचे ३६ आमदार पुन्हा मैदानात असून त्यांच्या संपत्तीत सरासरी १७२ टक्के वाढ झाली आहे.