आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena News In Marathi, Shetkari Kamgar Party

रायगड, मावळात शेकाप उमेदवारांना मनसेचा पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मावळ आणि रायगड या दोन लोकसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना मनसेने पाठिंबा दिला आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे, शेकाप आणि जनसुराज्य असा एक वेगळा पर्याय देण्याचे संकेतही या भेटीतून दिले गेले.


रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना आणि शेकापची एकत्रित सत्ता असतानाही शेकापने मनसेचा पाठिंबा घेतल्याने आता शिवसेना काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. जयंत पाटील म्हणाले की, सत्ताधा-यांच्या भ्रष्टाचाराची नित्य नवी प्रकरणे पुढे येत आहेत आणि विरोधी पक्षही सत्ताधा-यांना जाब विचारण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता एक वेगळा पर्याय म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. विधानसभेला आम्ही एकत्र येणार आहोत.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही जयंत पाटील यांच्या म्हणण्याला दुजोरा देत या दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार उभे नसल्याने आम्ही शेकापला पाठिंबा देत आहोत असे जाहीर केले. तसेच आम्ही उभे केलेल्या 9 मतदारसंघांतही शेकाप आम्हाला शक्य ती मदत करेल असेही बाळा नांदगावकर म्हणाले.


दोन आठवड्यापुर्वी जयंत पाटील आणि विनय कोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळीही तिस-या पर्यायासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पाटील आणि कोरे यांनी सांगितले होते. आता त्या दिशेने या पक्षांची पावले पडत असल्याचे स्पष्ट होत असून मनसे,शेकाप आणि जनसुराज्य पार्टी एकत्र आल्यास विधानसभेत या तिघांनाही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सध्या विधानसभेत मनसेचे अकरा, शेकापचे चार तर जनसुराज्य पार्टीचे दोन आमदार आहेत.