आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra NCP Leader RR Patil Passes Away News In Marathi

अजातशत्रू आबा: डान्सबार बंदी करून घेतले महिलांचे आशीर्वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची एखादी सभा असो किंवा एखादा स्थानिक राजकीय कार्यक्रम असो.. प्रमुख पाहुणे जर आर. आर. पाटील असतील तर या कार्यक्रमाला महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय असे.. नुसते औक्षणच नाही तर मायेने अलाबला करून आपल्याच डोक्यावर कडाकडा बोटे मोडून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणा-या महिला.. मायभगिनींची एवढी माया क्वचितच एखाद्या राजकीय नेत्याला लाभली असावी.. त्याचे कारण होते अाबांनी राज्यात लागू केलेली डान्सबार बंदी.. या एकाच निर्णयाने पाटील राज्यातल्या जनतेचे लाडके आबा झाले.
आर. आर. यांनी गृहमंत्रिपदाच्या कारकीर्दीत घेतलेल्या डान्सबार बंदीच्या निर्णयाला त्यांच्या राजकीय आयुष्यात एक मोठे स्थान आहे. ऑगस्ट २००५ मध्ये मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मध्ये सुधारणा करून राज्य सरकारने हा निर्णय राज्यभरात लागू केला आणि एकट्या मुंबईतील ७०० डान्सबार आणि राज्यभरातले साधारण ६५० डान्सबार एका झटक्यात बंद करून दाखवण्याची किमया करून दाखवली.
त्यांच्या या निर्णयाविरोधात डान्सबार मालक, बारबाला आणि समाजातल्या एका विशिष्ट वर्गातून टीकाही झाली. मात्र, तरीही आपल्या निर्णयावर ठाम राहत आबांनी ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे डान्सबारवरील करापोटी मिळणारे सरकारचे हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न बंद झाले तरी बेहत्तर, पण कोवळ्या तरुणांना व्यसनाधीन होऊ देणार नाही, या आबांनी घेतलेल्या भूमिकेला सर्वसामान्यंानी उचलून धरले. त्या वेळी विधिमंडळातील त्यांची धडाकेबाज भाषणे चांगलीच गाजली. खरे तर डान्सबार बंदीची मागणी सर्वप्रथम पनवेलचे तत्कालीन आमदार विवेक पाटील यांनी केली हाेती, मात्र ती ठामपणे पुढे नेण्यात आणि त्याचे निर्णयात रूपांतर करण्यात आबांनी दाखवलेली धडाडी अजोड होती. पुढे कायद्यातल्या पळवाटांचा आधार घेत बारमालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली. मात्र, पुन्हा एकदा २०१४ च्या पावसाळी अधिवेशनात राज्याच्या विधिमंडळात डान्सबार बंदीचा कायदाच आणत राज्य सरकारने ही बंदी कायम केली. योगायोग म्हणजे २०१४ मध्ये हा कायदा करतानाही गृहमंत्रिपदी आर. आर. पाटीलच होते. या वेळीसुद्धा त्यांनी डान्सबार बंदीच्या समर्थनार्थ विधिमंडळात केलेले भाषणदेखील संस्मरणीय होते. आपल्या विविध मंत्रिपदांच्या काळात आर. आर. पाटील यांनी ग्राम स्वच्छता अभियान किंवा तंटामुक्त गाव यासारखे राज्याच्या राजकारणात मैलाचा दगड ठरतील असे निर्णय घेतले. मात्र, त्यांच्या डान्सबार बंदीच्या निर्णयानंतर राज्यातल्या जनतेचे ते लाडके "आबा' झाले.

निष्कलंक नेता
राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अाराेप झाले, मात्र निष्कलंक आणि चारित्र्यवान नेता म्हणून आर.आर. आबांची ओळख होती. त्यामुळे स्वाभाविकच कोणत्याही निवडणुकांना सामोरे जाताना आबांचा स्वच्छ चेहराच राष्ट्रवादीच्या कामी येत होता. म्हणूनच २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकांच्या काळात आबांकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवून राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवले.

पुढील स्‍लाईडवर वाचा आंबाच्‍या एकदिवशीय वकिली विषयी...