आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra NCP Leader RR Patil Passes Away News In Marathi

अजातशत्रू आबा गेले; माजी गृहमंत्री अार. अार. पाटीलांचे निधन, कॅन्सरशी लढा ठरला अपयशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सामान्यांचा चेहरा, संवेदनशील माणूस, उकृष्ट संसदपटू व ग्रामविकास तसेच गृहमंत्री म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी बजावलेले राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील उर्फ आबा (५७) यांचे सोमवारी लीलावती रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.
सोमवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मंत्रालयासमोर राष्ट्रवादी भवनात ठेवण्यात आले. मंगळवारी दुपारी १२ वाजता सांगली जिल्ह्यातील अंजनी या त्यांच्या मूळगावी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

तीन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजणा-या आबांवर प्रारंभी बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर लीलावतीमध्ये हलवण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले जात होते. मध्यंतरी आबा चालत असल्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर झळकली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांत त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. हळूहळू त्यांचे अवयव निकामी होत गेल्याने सोमवारी सकाळी प्राणज्योत मालवली.

सामान्य कुटुंबातून आलेल्या आबांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाचा श्रीगणेशा करत अल्पावधीत राज्याच्या राजकारणात मोठे स्थानइ मिळवले. उत्कृष्ट वक्तृत्व व हजरजबाबीपणा हे गुण हेरून वसंतदादा पाटील यांनी त्यांना राजकारणात आणले. नंतर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांनी मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. झोकून देऊन काम करण्याच्या गुणांमुळे आबांनी ग्रामविकास, गृहमंत्री व उपमुख्यमंत्रिपद या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. सामान्यांचा कायम विचार करणाऱ्या आबांची विरोधी पक्षनेता म्हणून कारकीर्दही गाजली होती.

आबांनी अनेक वर्षे सत्तेत राहूनही कुटुंब गावातच ठेवले. सत्तेच्या साऱ्या सुविधा पायाशी असूनही त्यांनी आई, पत्नी व मुलांना त्याचा वारा लागू दिला नाही. आजही त्यांचे कुटंुब शेतात राबते.
त्यांच्या प्रामाणिकपणामुळे राज्यातील जनतेला आबा घरातीलच एक माणूस असल्यासारखे वाटत. राज्यातील पुरोगामी तसेच कृितशील कार्यकर्त्यांना तर त्यांचा मोठा आधार होता.
अण्णा हजारे, पोपटराव पवार, नरेंद्र दाभोलकर, मेधा पाटकर, अभय बंग, प्रकाश आमटे या साऱ्यांना आबा मदत करत. म्हणूनच राष्ट्रवादीबद्दल आक्षेप असला तरी आबांच्या प्रचारासाठी ही मंडळी तासगावला येत असे.

आबा, बस्स झाली तंबाखू!
आबांनी राजकारणातील आपला आदर्श चेहरा शेवटपर्यंत जपला. आबांना तंबाखूचे व्यसन होते. त्यांनी व्यसन सोडावे म्हणून राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांनी खूप प्रयत्न केले. अजित पवार तर नेहमी म्हणत "आबा, बस्स झाली तंबाखू. तुमच्या हातातील रुमालही किती पिवळा, झालाय तो पाहा...' मात्र, आबांचे हे व्यसन काही सुटले नाही. तोंडाचा कॅन्सर त्यांना जडला. आबांच्या कार्यालयातील शिपायांनीही ब-याचवेळा त्यांना समजावले हाेते. त्यांनी अनेक गोष्टी ऐकल्या, ही एकच गोष्ट अशी होती जी मनावर घेतली नाही.
सच्चा माणूस : फडणवीस
संवेदनशील नेता, उत्कृष्ट संसदपटू व सच्चा माणूस आपल्यातून गेला. त्यांच्या ग्रामस्वच्छता अभियानाने परिवर्तन घडले. डान्सबार बंदीचा निर्णयही नैतिकतेचे रक्षण करणारा होता. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
ठसा उमटवला : शरद पवार
आरआर यांनी जी मंत्रिपदे भूषवली त्यावर ठसा उमटवला. देशात आता स्वच्छता अभियान राबवले जात आहे. आबांनी ही चळवळ दहा वर्षांपूर्वी राबवली. त्यांची कमी कायम जाणवेल. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस