आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात ‘ऑलिम्पिक भवन’ उभारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न क्रीडा संघटनांची कार्यालये एकाच इमारतीत आणून कामकाजात सुसूत्रता निर्माण करण्यासाठी राज्यात ऑलिम्पिक भवन उभारले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी केली.

उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव जे. एस. सहारिया, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त पंकजकुमार आदी उपस्थित होते.

राज्यात घेण्यात येणार्‍या क्रीडा स्पर्धा, शिबिरे, प्रशिक्षण वर्गांसाठी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात जागा माफक दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. जिल्हा आणि विभागीय स्तरावरील क्रीडा संकुलात सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून देण्याचा अधिकार संबंधित समितीचा आहे. परंतु, जिल्हा किंवा विभागीय क्रीडा संकुलांच्या ठिकाणी स्पर्धा, शिबिर, प्रशिक्षणासाठी येणार्‍या खर्चाचा आढावा घेऊन त्याची माहिती उपलब्ध केल्यास त्याप्रमाणे निधीची तरतूद करण्याबाबत शासन विचार करेल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पदक विजेत्यांना क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश मिळणार
राज्य क्रीडा परिषदेची फेररचना करताना प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्याचबरोबरीने ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न क्रीडा संघटनांनाही परिषदेवर योग्य प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून चमकदार कामगिरी करून पदक पटकावणार्‍या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व क्रीडा संस्था तसेच संघटनांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढवण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.