आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Police Files FIR Against Pravin Togadia

डॉ. प्रवीण तोगडिया यांना कोणत्याही क्षणी अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड/मुंबई - प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भोकर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात लावण्यात आलेली सर्व कलमे दखलपात्र आहेत. तसेच त्यांच्या अटकेसाठी पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथकही नेमण्यात आले आहे. त्यामुळे तोगडिया यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती नांदेडचे पोलिस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी शुक्रवारी रात्री दै. ‘दिव्य मराठी’ला दिली.

नांदेडच्या पोलिसांना तोगडिया यांच्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्ये असल्याचे आढळून आले. त्यावरूनच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आता तोगडिया यांना अटक करायची किंवा नाही हे तपास अधिकारीच ठरवतील, असे राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत स्पष्ट केले. त्यानंतर नांदेडचे पोलिस प्रमुख जाधव यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी अटक करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तयारी केली असल्याचे सांगितले.

भोकर येथे आयोजित संमेलनात तोगडिया यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावरून त्यांच्याविरोधात भादंविच्या 295 (अ), 153, 505 (2) कलमान्वये भोकर पोलिसांत गुरुवारी गुन्हा नोंदवण्यात आला. ही सर्व कलमे दखलपात्र असल्याने त्यांना अटक करावीच लागेल.

दोन दिवसांत अटक करू - पोलिस निरीक्षक पंडित मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले आहे. कागदपत्रे, पुरावे गोळा करण्याचे काम पूर्ण होताच उद्या शनिवारी रात्री किंवा रविवारी हे पथक रवाना होईल. असतील तेथे जाऊन तोगडियांना अटक केली जाईल.’’ विठ्ठलराव जाधव, एसपी, नांदेड

ओवेसींशी तुलना नको - ओवेसी यांचे वक्तव्य देशद्रोही होते. त्याच्याशी तुलना होऊ नये. तोगडिया यांच्या भाषणात तसे काही आढळून आले तर कायदा सक्षम आहे. मुख्तार अब्बास नकवी, उपाध्यक्ष, भाजप

मतांवर डोळा ठेवून केलेली कारवाई - मतांसाठी चटावलेल्या राजकीय लोकांनी षड्यंत्र रचून ही कारवाई केली आहे. काही राज्यांत लवकरच आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. अशा वेळी कायद्याचे झेंगट मागे लावून मला अडकवून ठेवण्यासाठी ही खेळी आहे.’’- डॉ. प्रवीण तोगडिया, नेते, विश्व हिंदू परिषद

कारवाई आम्हीच केली - कारवाई केंद्राच्या निर्देशानंतर केलेली नाही. त्यात उशीरही झालेला नाही. कोणीही निर्देश दिले नाहीत. तोगडिया यांचे भाषण तपासल्यानंतर राज्य सरकारने स्वत:हून हा निर्णय घेतला. त्यानुसारच कारवाई होत आहे.’’ पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

वक्तव्ये तपासून कारवाई - अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नको. त्यामुळे तोगडियांची वक्तव्ये तपासण्यासाठी विधी अधिकार्‍यांकडे पाठवली आहेत. अहवालानंतर योग्य कारवाई होईल. फुटीर वक्तव्ये करणार्‍या कुणालाही सोडले जाणार नाही. आर. आर. पाटील, गृहमंत्री

नांदेड - तोगडिया यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी भोकरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पाळला. या बंदला 70 टक्के प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शहरातील बाजारपेठ, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये पूर्णत: बंद होती. बस व रेल्वे वाहतुकीवर मात्र बंदचा परिणाम झाला नाही. कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.