आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या थीम पार्कला ‘ब्रेक’, रेसकोर्स भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासाठी CM ची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईच्या महालक्ष्मीतील रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांना ब्रेक लावून या रेसकोर्सच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे हे धोरण मंजूर होत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री बैठकीत गप्पच राहिले. एका कनिष्ठ मंत्र्याने याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करताच मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही गप्प केले, असे सूत्रांनी सांगितले.
सुमारे साडेआठ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा रेसकोर्स रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाड्याने देण्यात आला आहे. हा भाडेकरार ३१ मे २०१३ रोजी संपला. तेव्हापासूनच या जागेवर थीम पार्क उभारण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही होते. मात्र, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मुंबई महापालिकेच्या “डब्ल्यू’ अनुसूचीमधील रेसकोर्ससह सर्व १६० मालमत्तांच्या नूतनीकरणाचा मार्ग खुला करणाऱ्या धोरणास मंजुरी दिली. रेसकोर्स वगळता अन्य १५९ मालमत्तांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. रेसकोर्सच्या नूतनीकरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मात्र राज्य सरकारने आपल्याकडे राखून ठेवला. त्याच वेळेस रेसकोर्सचे पुढील ३० वर्षांसाठी नूतनीकरण करणे शक्य होईल हे धोरण राज्य सरकारने मंजूर करून घेतले अाहे. मुंबई महापालिकेच्या अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची एकप्रकारे नाकेबंदी करणारा मुद्दाच मुख्यमंत्र्यांनी अापल्या हाती ठेवल्याचे सांगितले जाते.
काय आहे ‘डब्लू’ अनुसूची ?
१९ व्या शतकात मुंबईत ‘प्लेग’ आल्यावर १८९८मध्ये एका कायद्याद्वारे मुंबईतील सर्व मोकळ्या जागांचा ताबा बाॅम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टला ( बीआयटी) देण्यात आला. त्यानंतर १९२६ मध्ये एका कायद्याद्वारे बीआयटी रद्द करण्यात आली आणि या सर्व १६० जागांचा मुंबई मनपाच्या डब्ल्यू अनुसूचित समावेश करण्यात आला. या जागांवर मालकी सरकारची, तर देखभाल जबाबदारी मनपाची आहे. यापैकी १०८ जागांचा भाडेकरार संपुष्टात आला असून त्यांचे नूतनीकरण प्रलंबित आहे. मात्र, या नूतनीकरणासाठी कोणतेही धोरणच नसल्याने भाडेपट्टा संपूनही नूतनीकरण करणे शक्य होत नव्हते. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे हा मार्ग खुला झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...