आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Sadan Case : Bhujbal Family Not Interested To Face ACB

महाराष्ट्र सदन घोटाळा : ‘एसीबी’समोर हजर राहण्यास भुजबळ कुटुंबीयांची टाळाटाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेल्या चौकशीसाठी माजी मंत्री छगन भुजबळ हे सोमवारी हजर होतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी या चौकशीकडेच पाठ फिरविली. त्यामुळे त्यांची व भुजबळ कुटुंबीयांची खुली चौकशी सुरू आहे की चौकशीचा फार्स, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वारंवार समन्स बजावूनही माजी मंत्री छगन भुजबळ अजून चौकशीसाठी हजर झाले नाहीत. उलट विविध कारणे पुढे करत चौकशी टाळण्याकडेच त्यांचा कल दिसतो आहे. त्यामुळे खरोखरच चौकशीतून काही निष्पन्न होणार आहे का असा प्रश्न या प्रकरणात न्यायालयीन दाद मागणाऱ्यांना पडला आहे.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. त्यानुसार सध्या भुजबळ आणि कुटंुबियांची खुली चौकशी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू आहे. मात्र स्वत: भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांकडून या चौकशीला प्रतिसाद दिला जात नसल्याचे पहायला मिळते आहे.

भुजबळ कुटुंबियांपैकी फक्त माजी खासदार समीर भुजबळ हे एसीबीच्या मुंबईतील वरळी येथील मुख्यालयात चौकशीसाठी शुक्रवारी पहिल्यांदा हजर झाले. मात्र आर.आर. पाटील यांच्या शोकसभेला जाण्याचे कारण सांगत समीर भुजबळ हे चौकशी अर्धवट टाकूनच कार्यालयाबाहेर पडले होते. तसेच शनिवारी एका खासगी कार्यक्रमासाठी जायचे असल्याचे सांगत दुसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याबाबतही त्यांनी असमर्थता दाखवली होती. त्यामुळे उर्वरित चौकशीसाठी ते सोमवारी एसीबीच्या मुख्यालयात हजर राहतील असे सांगण्यात आले होते.
याशिवाय पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्यासह कुटुंबातील इतरही काही सदस्यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. ते सुद्धा सोमवारी चौकशीसाठी हजर राहतील, असेही एसीबीच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र सोमवारी दिवसभर भुजबळ कुटुंबियांपैकी कोणीही एसीबीच्या मुख्यालयाकडे फिरकलेच नाहीत.
हजर राहण्याचे भुजबळांवर बंधन नाही : एसीबी

चौकशीला भुजबळ कुटुंबिय करत असलेल्या टाळाटाळी संदर्भात एसीबीच्या एका अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी दिव्य मराठीला प्रतिक्रिया दिली. "आम्ही महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आरोप असलेल्या प्रत्येकाला चौकशीसाठी वारंवार समन्स बजावत आहोत. या समन्सनुसार त्यांनी स्वत:हून चौकशी पथकासमोर हजर राहणे अपेक्षित आहे.
चौकशीसाठी त्यांनी हजर रहावे असा दबाव आम्ही त्यांच्यावर आणू शकत नाही. आणि ते स्वत:हून आले नाहीत, तर तसाच अहवाल आम्ही न्यायालयासमोर सादर करू', असे हा अधिकारी म्हणाला.
कधी ना कधी तुरुंगात जावेच लागेल : किरीट सोमय्या
महाराष्ट्र सदनाबाबतच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून २८ फेब्रुवारीला त्याबाबतचा चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या चौकशीदरम्यान भुजबळ कुटुंबिय आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित काही लोक अशा जवळपास १२ ते १५ लोकांना एसीबीने समन्स बजावले आहे. अशावेळी पुढील चार दिवसांत न्यायालयाला अपेक्षित अशी चौकशी पुर्ण होईल का?असा सवाल याचिकाकर्त्यांमार्फत विचारला जात आहे.
याप्रकरणातील तक्रारदार भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘ज्या अर्थी भुजबळ चौकशीसाठी हजर होत नाहीत, त्याअर्थी त्यांच्या मनात पाप आहे. शिवाय अशी टाळाटाळ करून ते किती दिवस कारवाईपासून दूर राहू शकतील. शेवटी कधी ना कधी त्यांना तुरूंगाचा दरवाजा पहायला लागणारच आहे’.