आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Sadan Case: Charge sheet Filed Against Chhagan Bhujbal

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांवर आरोपपत्र, अन्य सोळा जणांचाही समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अखेर माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सतरा जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. तब्बल वीस हजार पानांच्या या आराेपपत्रात ६० जणांच्या साक्षी आहेत.
महाराष्ट्र सदन या राज्य सरकारच्या अतिथिगृहाच्या बांधकामात झालेली अनियमितता आणि मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातील कालिना भूखंड परस्पर एका विकासकाला हस्तांतरित केल्याप्रकरणी एसीबीने गेल्या वर्षी जूनमध्ये छगन भुजबळ यांच्यासह सोळा जणांवर दोन एफआयआर दाखल केले होते.

आरोपपत्र दाखल केलेल्यांमध्ये छगन भुजबळ यांच्यासह पीडब्ल्यूडीचे तत्कालीन अधिक्षक अभियंता अरूण देवधर, मुख्य अभियंता माणिकलाल शहा, तत्कालीन सचिव देवदत्त मराठे, दीपक देशपांडे, मुख्य वास्तुविशारद बिपीन संखे, कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड, विकासक कृष्णा चमणकर, प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, वास्तुविशारद प्रसन्ना चमणकर, माजी खासदार समीर भुजबळ, नीश इन्फ्राचे तन्वीर शेख, अोरिजीन इन्फ्राचे इरम शेख, संजय जोशी आणि गीता जोशी अशा एकूण सतरा जणांविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यापैकी समीर भुजबळ हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सक्तवसुली संचालनालयानेही भुजबळ कुटंुबियांच्या मालकीची जवळपास तीनशे कोटींची मुंबईसह नाशिकस्थित मालमत्ता जप्त केली होती. लोकसेवकाने केलेली गुन्हेगारी स्वरुपाची वर्तणूक, फसवणूक, खोटी कागदपत्रे सादर करणे तसेच गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे आणि त्यात एकमेंकाना सहाय्य करणे या आरोपांखाली लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये हे गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी२०१४ साली आम आदमी पार्टीच्या एका जनहित याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने सखोल चौकशीचे आदेश एसीबीला दिले होते.

आरोपपत्रात उल्लेख साडेतेरा कोटींचाच
महाराष्ट्र सदन घोटाळा २५०० कोटींचा, चमणकरांना दहा हजार कोटींचा फायदा झाला, असे अनेक आरोप झाले. मात्र आरोपपत्रात १३.५ कोटींचाच उल्लेख आहे. भुजबळांवर विकासकाला २०% एेवजी ८० % फायदा देण्याच्या बदल्यात १३.५ कोटी काळा पैसा स्वीकारल्याचा आरोप एसीबीने ठेवला आहे.