आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम; \'कामावर रुजु व्हा\', सरकारने केलेले आवाहन धुडकावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ मुंबई- राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. 'ऐन दिववाळीत प्रवाशांना वेठीस ठेवू नका, सायंकाळी पाच वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा', असे सरकारचे आवाहन संपकरी एसटी कर्मचार्‍यांनी धुडकावून लावले आहे.

काय म्हणाले परिवहन मंत्री...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. राज्य परिवहन महामंडळाकडे पैसाच नाही, त्यामुळे पुढील 25 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, असे म्हणत रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे.

रावते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप कामगार न्यायालयाने, औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. तरीही सातव्या वेतन आयोगासाठी त्यांनी संप पुकारला आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महामंडळाकडे निधी नाही. त्यामुळे पुढील 25 वर्षे तरी लागू करू शकत नाही.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मी सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही, तुम्हालाही देऊ शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ऐन दिवाळीत संप पुकारुन जनतेला वेठीला धरु नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

दुसरीकडे, रावते यांच्या वक्तव्याने एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटण्याऐवजी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सातवा वेतन आयोग लागू करण्‍याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. आज (17 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे ऐनदिवाळीत प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

कोल्हापूर आणि बीडमध्ये या संपाला हिंसक वळण लागले आहे. कोल्हापूरात अज्ञात व्यक्तींकडून पुणे- बेळगाव एसटीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, बीडमध्ये राज्याचे परिवहन मंत्री  दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्‍यात आले आहे.

दरम्यान, राज्यात एसटीची कर्मचारी संख्या 1 लाख 7 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे. एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे. परिवहन विभाग शिवसेनेकडे असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- कामावर रुजु न झाल्यास कारवाई करू; संपकरी एसटी कर्मचार्‍यांना महामंडळाचा आदेश
- पुणे- पहाटेपासून स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन, वल्लभ नगर येथील एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी
- संपामुळे दिवाळीमध्ये बाहेर गावी जाणार्‍या प्रवाशांचे मात्र हाल
- नाशिक: आरटीओकडून खासगी बसेस सुरु करण्याचा प्रयत्न
- कोल्हापूर: कागल बस डेपोत अज्ञातांकडून पुणे-बेळगाव बसवर दगडफेक
- बीड: अंबाजोगाई येथे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पुतळ्याचे दहन

संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता
- या संपात  मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत.
- दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
- दरम्यान या संपात कामगार सेना सहभागी होणार नाही. कामगार सेनेचे कर्मचारी कामावर जातील.

या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :
- एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावापदनिहाय वेतनश्रेणी द्यावी. 
- कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी.
- इतर राज्यांच्या तुलनेने एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन असल्याचे तसेच या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याची मागणी.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी मुखमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...