आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक, सत्ताधारी शिवसेना अामदारही आक्रमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभेत चंद्रकांत पाटील यांना ‘अाम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू’ या अजित पवार यांच्या वक्तव्यावर  पाटील यांनी विधानभवन परिसरात भेटल्यानंतर दाद दिली. - Divya Marathi
विधानसभेत चंद्रकांत पाटील यांना ‘अाम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू’ या अजित पवार यांच्या वक्तव्यावर पाटील यांनी विधानभवन परिसरात भेटल्यानंतर दाद दिली.
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी विधानसभेत विराेधकांसह सत्ताधारी शिवसेनेचे अामदार चांगलेच अाक्रमक झाले हाेते. विरोधकांच्या गाेंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या अामदारांनी वेलमध्ये उतरून सरकारला जाब विचारला. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार व विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेत ‘सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवेत?’,  असा संतप्त सवाल केला. दरम्यान, गाेंधळ वाढत असल्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर विराेधी अामदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसूनही अांदाेलन केले.  

बुधवारी सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाअंतर्गत बोलण्याची परवानगी अध्यक्षांकडे मागितली. परवानगी दिल्यानंतर ते म्हणाले, ‘कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात ठेवून फिरत होते, अाता कुठे गेले त्यांचे राजीनामे? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशिवाय आता कोणताही महत्त्वाचा विषय नाही. बाकी सगळे विषय बाजूला ठेवून सरकारने कर्जमाफी घोषित करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.   
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या दरम्यान सदस्यांना या विषयावर बोलता येईल, अाता प्रश्नोत्तराचा तास होऊ द्यावा, असे अध्यक्षांनी म्हटले. मात्र विरोधक एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. सभागृहात गाेंधळ वाढत असल्यामुळे अध्यक्षांनी ११.२० वाजता कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले. पंधरा मिनिटांनंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनांचा पुकारा केला. मात्र विरोधकांचा कर्जमाफीच्या मागण्यावरून गोंधळ सुरू राहिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी घाेषणाबाजी करत अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत धाव घेतली. त्यामुळे तालिका अध्यक्षांनी पुन्हा कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर तीच परिस्थिती हाेती. काही सदस्यांनी कागदपत्रे फाडून हवेत फेकण्यास सुरुवात केली. या गाेंधळातच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र विराेधकांचा गाेंधळ वाढतच गेला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
 
अाता ही मागणी अवास्तवच
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल, असे नुकतेच सांगितले आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना यापुढे कधीही कर्ज काढावे लागू नये, अशा उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकरी सक्षम झाल्यानंतर त्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याने आता सभागृहात अशी मागणी करणे अवास्तव आहे.   
पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री  
 
२१ लाख शेतकऱ्यांवर 
११ हजार काेटींचे कर्ज  

मागील अधिवेशनात दुष्काळामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठन करण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात अाली हाेती. तेव्हा राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांवर तब्बल ११ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. सन २००८ मध्ये आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे ६५०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, चंद्रकांतदादा तुम्ही कर्जमाफी करा, अाम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू; पवारांचा टाेला...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...