आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंटिंस्टची संख्या राज्यात वाढणार, 1063 पदांची निर्मिती करणार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शहरी व ग्रामीण भागात तोंडाचा कर्करोग, दंतक्षय, हिरड्यांचे आजार वाढत असल्याने त्यावर उपाय व्हावेत म्हणून जिल्हा रुग्णालयांमध्ये डेंटिस्टची संख्या एकवरून दोन करण्याचे आणि सार्वजनिक आरोग्य सेवा सशक्त करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मौखिक आरोग्य तसेच दंतचिकित्सा विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी व सर्व ग्रामीण रुग्णालयात नव्याने हा विभाग निर्माण करण्यासाठी 1065 पदांची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी 87.33 कोटी रुपये खर्च करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
तालुका पातळीवरही डेंटिस्ट
राज्यात सध्या 16 हजार नोंदणीकृत दंतशल्य चिकित्सक असून 32 दंत वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यापैकी 3 शासकीय तर 29 खाजगी असून अंदाजे 1400 ते 1500 दंतशल्य चिकित्सक प्रत्येक वर्षी पदवी घेऊन बाहेर पडतात, परंतु त्यातील 75 टक्के चिकित्सक शहरी भागात तर 25 ते 30 टक्के ग्रामीण भागात काम करतात. हे प्रमाण अतिशय विसंगत असून ग्रामीण भागासाठी मौखिक आरोग्याच्या अधिक सोयी-सुविधा सरकार उपलब्ध करून देईल. यासाठी जिल्हा रुग्णालये तसेच 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुट कॅनल ट्रिटमेंट, दातावर कॅप बसविणे, कॉस्मॅटिक डेंटीस्ट्री, जबड्याच्या मोठ्या शस्त्रक्रिया, मुख कर्करोग तपासणी आदी सुविधांसह नवीन अत्याधुनिक डेंटल युनिट, क्ष-किरण चिकित्सा, सर्जिकल किट, निर्जंतुकीकरण सोयी या विभागात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात आणि 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात देखील दंतचिकित्सा विभाग सुरु केला जाणार आहे.
दंतक्षयाचे प्रमाण गंभीर
राज्यात मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे शालेय आरोग्य तपासणी शिबिरात आढळून आले आहे. शिबिरात मुलांमध्ये दंतक्षयाचे प्रमाण 92 टक्के तर हिरड्यांच्या आजाराचे प्रमाण 67 टक्के आढळले. युवा पिढीत सध्या पानमसाला, गुटका आणि धुम्रपानाचे प्रमाण 60 ते 80 टक्के असल्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.