मुंबई - राज्यात सत्ता मिळाली तर सर्व टोल बंद करू अशी गर्जना करुन सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती सरकार महाराष्ट्रातील 70 टोल नाके बंद करण्याचा विचार करत आहे . त्यासोबत अशीही चर्चा आहे, की खासगी चारचाकी वाहनांना (कार) टोलमाफी देण्यात येईल.
जे 70 टोल नाके बंद करण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे 35 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 35 टोल नाक्यांचा समावेश आहे.
या 70 पैकी 11 टोलची मुदत काही दिवसांमध्ये संपत आहे. कंत्राटदानां त्याचे उर्वरित पैसे देऊन हे टोल ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे. यासाठी 500 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र बंद होऊ शकणारे टोल नाके कोणते याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकार नवे टोलधोरण जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे खासगी कारला टोल माफी देण्याचीही शक्तता आहे. त्यासाठीही सरकार कंत्राटदारांना भरपाई देण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.