आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आठ दिवसांत, औरंगाबादचे सावे यांची वर्णी लागण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या आठ दिवसांत होणे अपेक्षित असून सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या रिक्त असलेल्या बारा मंत्रिपदांपैकी किमान दहा मंत्रिपदे या विस्तारादरम्यान भरली जाणार असून या वेळी मंत्रिपदे देताना जातीय समीकरणाला तसेच विभागवार समतोल साधण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.

शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने निश्चिंत झालेल्या फडणवीस सरकारला आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. सध्या रिक्त असलेल्या बारा मंत्रिपदांपैकी दोन राज्यमंत्रिपदे ही शिवसेनेच्या वाट्याची आहेत. सत्तेत सहभागी होताना शिवसेनेच्या शहरी भागातल्या चेहऱ्यांना अधिक संधी दिल्याने ग्रामीण भागातल्या आमदारांमध्ये असलेली नाराजी पाहता ही दोन्ही मंत्रिपदे मुंबई, ठाणे किंवा पुणे यासारखी मोठी शहरे वगळता ग्रामीण भागातल्या आमदारांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या कोट्यातील मंत्रिपदांसाठी शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील आणि कोल्हापूर जिल्ह्यातले राजेश क्षीरसागर यांची नावे आघाडीवर आहेत. याव्यतिरिक्त उरलेल्या दहा मंत्रिपदांपैकी दोन मंत्रिपदे मित्रपक्षांना दिली जाणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची या वेळी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या पदरी मात्र या विस्तारात काही पडेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.
चर्चा "ऑपरेशन लोटस'ची
भाजपच्याकोट्यातील दोन किंवा तीन मंत्रीपदे ही रिक्त ठेवली जाणार असून ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भविष्यात एखादा बडा नेता गळाला लागल्यास त्याची सोय या रिक्त जागांद्वारे लावता येईल हा त्यामागचा विचार असल्याची माहिती भाजपच्या एका बड्या नेत्याने दिली आहे.
इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू
भाजपमध्येमात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कमालीची उत्सुकता असून मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी आमदारांमध्ये जबरदस्त चुरस आहे. सलग तीन वेळा निवडून आलेल्या जयकुमार रावल आणि डॉ. संजय कुटे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या मंगलप्रभात लोढांनाही संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

पुढील स्लाइडमध्ये, मराठवाड्याला संधी, सावेंचीही चर्चा