आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार आता ‘करून दाखवणार’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभेच्या निवडणुकांत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेत अशी स्थिती होऊ नये, यासाठी खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने शिवसेनेच्या ‘करून दाखवलं’च्या धर्तीवर जाहिराती करण्याची योजना आखली आहे. यासाठी सर्व विभागातील जनसंपर्क अधिकार्‍यांना कामाला लावले असून जाहिरातींचा मजकूर तयार करण्यात येत आहे. सध्या फक्त एसटीवर जाहिराती लावण्यात येणार असून त्याचे काम पृथ्वी असोसिएट या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे.

सरकारच्या जनसंपर्क विभागातील अधिकार्‍याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, अगोदरच्या जनसंपर्क महासंचालकांनी खासगी पीआर कंपनीकडे राज्य सरकारच्या जाहिरातींची जबाबदारी सोपवण्याचे ठरवले होते. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या होत्या, परंतु एकही निविदा मंजूर न झाल्याने आता राज्य सरकारचा जनसंपर्क विभागच जाहिराती तयार करणार आहे.

जाहिरातींच्या स्वरूपाबद्दल माहिती देताना या अधिकार्‍याने सांगितले, सध्या सरकारतर्फे ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यासाठी रस्ते विकास, महामार्गांचे जाळे, ब्लड ऑन कॉल योजना, अँम्ब्युलन्स योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, महिला बाल विकासच्या योजना, बांधकाम मजुरांसाठीच्या योजना यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

​जाहिरातीत सोनिया
वर्तमानपत्रांसाठी वेगळ्या जाहिराती तयार करण्यात येणार असून फक्त विकासकामांवरच भर दिला जाणार आहे. जाहिरातींत सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांचे फक्त बसेसवरील जाहिराती खासगी कंपनीच्या माध्यमातून दिल्या जाणार असल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले.

निर्मितीही करणार
सरकारने योजनांचा प्रचार करण्यासाठी खासगी पीआर कंपनी नेमण्याचा प्रस्ताव मांडला होता, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आता सरकार स्वत:च जाहिरातींची निर्मिती करणार आहे. रेडिओ, दूरदर्शन आणि सर्व मराठी वाहिन्यांवरून चित्रफितीद्वारे राज्य सरकारने केलेल्या कामांची जाहिरात केली जाणार आहे.