आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूजल उपशाला चाप: राज्यात 200 फुटांपेक्षा जास्तीचे खोल बोअर घेण्यास बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भूजल पातळीतील घसरण रोखण्यासाठी राज्य सरकारने 200 फुटांपेक्षा जास्त खोल बोअर घेण्यास बंदी घातली आहे. तसेच त्याचा भंग केल्यास संबंधितांना सहा महिने ते एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास व 25 हजार रूपये दंड करणार असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

राज्यातील भूजलाची पातळी दिवसेंदिवस खाली चालली आहे. यामागे जमिनीतून पाण्याचा अविरत उपसा होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठीच भूजल विकास आणि व्यवस्थापन अधिनियम गेल्यावर्षीपासून राज्यात अंमलात आला आहे. जमिनीखालील पाण्याचा उपसा रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा बनविण्यात आला आहे. या कायद्याची नियमावली तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. तो पूर्ण होताच एक-दोन महिन्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. सध्या सुरु असलेल्या कायद्याच्या नियमावलीत 200 फुटांपेक्षा खोल जमिनीतून पाणी उपसता येणार नाही व 200 फुटांपेक्षा जास्तीचे खोल बोअर (कूपनलिका) मारता येणार नाही.
...तर तुरुंगवास व दंड- जर एखाद्या शेतक-याने, व्यक्तीने हा कायदा मोडत बोअर घेतल्यास त्यांनाही शिक्षा होणार आहे. तसेच बोअर घेणा-या कंत्राटदाराने कुठेही असा गुन्हा केल्यास प्रथम त्याला 10 हजार रुपये दंड केला जाईल व त्यानंतर त्याचा वाहन परवाना (बोअर खांदण्याचा) निलंबित केला जाणार आहे. नंतरही असाच गुन्हा केल्यास 6 महिन्यांपर्यंत 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 25 हजार दंड यापैकी एक वा दोन्हीही शिक्षा होतील. जिल्हाधिकारी, तहसीलदारांना आपापल्या जिल्ह्यात व तालुक्यात बोअरवर लक्ष ठेवण्याचे व देखरेखीचे आदेश सरकारने काढले आहेत.
बातम्या आणखी आहेत...