आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Transport Minister Divakar Rawte Son Contro

पोलिसांशी वाद घातल्याने मंत्री रावतेंच्या मुलाला दंड, ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ ऐरणीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माझा मुलगा उन्मेषला मंगळवारी रात्री माहीम येथे दारू पिऊन गाडी चालवत असताना पोलिसांनी पकडल्याचे वृत्त सोशल मीडियावर येत होते. मी त्यामुळे प्रचंड दुःखी झालो. माझा मुलगा कधीही दारू पीत नाही. त्यामुळे हे कसे घडले याची माहिती मी घेतली असता वेगळेच कारण समोर आले आहे. केवळ पोलिसांशी वाद घातल्याने मी त्याला कलम ११० अंतर्गत दंड भरावयास लावल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी सांगितले.

रावतेंच्या मुलाला ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये पकडल्याचे वृत्त बुधवारी पसरले होते. मात्र, माहीम पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी असे काहीही घडले नसल्याचे स्पष्टीकरण केले होते. सायंकाळी दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘माझी मुले वेगळी राहतात आणि माझ्या नावाचा ते कधीही वापर करत नाहीत. मला ते आवडत नाही हे त्यांना चांगले ठाऊक आहे. मंगळवारी रात्री उन्मेषचा ड्रायव्हर आला नसल्याने त्याचा मित्र गाडी चालवत होता. माहीम पोलिसांनी नाकेबंदीदरम्यान त्याची गाडी थांबवली. त्याच्या मित्राने त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले; परंतु पोलिसाने माझ्या मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स मागितले, जे चूक होते, तरीही माझ्या मुलाने लायसन्स दाखवले. तेव्हा त्यावरील नाव वाचून पोलिसाने त्याला ‘दिवाकर रावते तुझे कोण?’ असा प्रश्न विचारल्याने तो रागावला व पोलिसाबरोबर त्याचा वाद झाला.

पोलिसांनी खरे तर ‘दिवाकर रावते कोण?’ असे विचारावयास नको होते. माझ्या मुलाने माझे नावही सांगितले नव्हते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांशी वाद घातला म्हणून मीच त्याला दंड भरावयास सांगितला. त्यानेही दंड भरला’, असे सांगून रावते यांनी दंड भरल्याच्या पावतीची
प्रतही दाखवली.
‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा मुद्दा ऐरणीवर
अभिनेता सलमान खान, अॅडव्होकेट जान्हवी गडकर यांच्या प्रकरणानंतर मुंबईत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. असा अपराध करणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचेही केंद्राने नुकतेच कोर्टात सांगितले आहे.