आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद सभापतिपदाच्या शर्यतीत युतीतर्फे नीलम गोर्‍हेही !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आठ मे रोजी होणार्‍या विशेष अधिवेशनात विधान परिषद सभापतीची निवड होणार आहे. परिषदेतील संख्याबळाचा विचार करता काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शिवाजीराव देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो; पण विरोधी पक्षानेही कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही, असा निर्धार केला आहे. शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधान परिषदेत राष्ट्रवादीचे 22, तर काँग्रेसचे 15 आमदार आहेत. भाजपचे 13, तर शिवसेनेचे 7 आमदार आहेत. आघाडीच्या 37 विरुद्ध युतीच्या 20 आमदारांचा विचार करता शिवाजीरावांचा विजय सोपा आहे. मात्र, आघाडीतच ऐंशी वर्षीय शिवाजीरावांच्या उमेदवारीला विरोध आहे. या बिघाडीच्या वातावरणात आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी विरोधकांना आशा वाटत आहे. त्यामुळेच नीलम गोर्‍हे यांना उभे केले जात असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. याविषयी प्रतिक्रियेसाठी नीलम गोर्‍हे स्वत: उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.
लोकसभेत सत्ताधार्‍यांविरोधात जात असलेला कौल तसेच आघाडीतच शिवाजीरावांविषयी नाराजी विरोधी पक्षाच्या पथ्यावर पडू शकते, असे बोलले जाते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात विधान परिषद आमदारांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने शेवटच्या क्षणी सभापतीही बिनविरोध करण्यासाठी ते प्रयत्न करतील, असेही कॉँग्रेसच्या गोटातून सांगितले जाते.
काँग्रेसला धास्ती राष्ट्रवादीची : तावडे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भीतीने काँग्रेसने सभापतीच्या निवडणुकीसाठी धावाधाव केली आहे. खरे तर या निवडणुकीसाठी 8 मे रोजी वेगळे अधिवेशन घेण्याची गरज नव्हती. लाखो रुपये खर्च करून हे अधिवेशन घेण्यापेक्षा 2 जूनपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनातच ही निवडणूक होऊ शकली असती. मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीचा भरवसा राहिलेला नाही. 16 मेच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीची नियत बदलली तर सभापतीच्या निवडणुकीला फटका बसू शकतो, अशी काँग्रेसच्या मनात भीती आहे, असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी लगावला.