आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Bjp Menifesto News In Marathi

जाहीरनाम्यासाठी भाजप साधणार संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामीविधानसभेसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व उमटावे यासाठी भाजप संपूर्ण राज्यभरात येत्या २० सप्टेंबर रोजी लोकांशी संवाद साधणार आहे. "जाहीरनाम्यासाठी लोकसंवाद' या उपक्रमात भाजपचे सर्व खासदार आणि पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोकांच्या सूचना आणि मागण्या ऐकून घेणार आहेत.
आपल्या जाहीरनाम्यात समाजातील सर्व क्षेत्रांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी भाजपने राज्यभरात "लोकसंवाद' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षाची ध्येयधोरणे रावबिताना सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर आमचा भर असून त्याची सुरुवात जाहीरनाम्यापासूनच करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज एक पत्रकार परिषदेत दिली. येत्या शनिवारी म्हणजे २० सप्टेंबर रोजी भाजपचे खासदार आणि प्रमुख पदाधिकारी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या मध्यवर्ती ठिकाणी लोकांच्या आगामी सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेणार आहेत. या वेळी औद्योगिक संस्था, शेतकरी, क्रीडा संघटना, सामाजिक संस्था, आणि विविध क्षेत्रातले मान्यवर, शहरातले प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आदींनाही आमंत्रित करण्यात येणार असून त्या त्या क्षेत्रातल्या समस्या आणि अपेक्षाही जाणून घेण्यात येणार असल्याचेही भंडारी म्हणाले. दरम्यान, भाजपच्या या मोहिमेनंतर आता शिवसेना जाहीरनाम्याबाबत काय पावले उचलते हे पाहणे औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचे भांडारींनी टाळले :
उद्धवठाकरेंनी सोमवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माधव भांडारी यांचा उल्लेख होताच माननिय, वंदनीय आणि परमपुज्य माधव भांडारी साहेब यांच्या कालच्या वक्तव्यावर मला काहीही बोलायचे नाही अशी भुमिका घेतली होती. त्याबाबत विचारले असता भांडारी म्हणाले की, मी जे काल बोललो ती आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भुमिका होती. आणि राहिला विषय उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचा, तर माझी आजून तितकी राजकीय उंची नाही की मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करावे.
सेना भाजप तणाव निवळत असताना शायना एनसी यांची नव्याने फोडणी
उद्धव ठाकरेंनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर रविवारी माधव भांडारींनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य करण्याचे उद्धव ठाकरेंनी टाळले. तसेच युती तुटेल असे मी काहीही करणार नाही अशी सारवासारवही त्यांनी केली. तसेच भांडारींबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या उपरोधिक टिप्पणीला उत्तर करण्याचे भांडारींनीही टाळले आणि वाद थंड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी भाजपच्या पत्रकार परिषदेत उपस्थित झालेल्या शायना एनसींनी या निवळत चाललेल्या वादाला नव्याने फोडणी दिली. मोदींबाबत सेनेच्या नेत्यांनी उलटसुलट वक्तव्ये करू नयेत असे त्यांनी यावेळी सुनावले.