आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Mahayuti News In Marathi

महायुती अभंग ठेवण्यासाठी छोट्या घटक पक्षांची लुडबुड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना-भाजपत जागावाटपावरून सुरू असलेल्या कलगीतुऱ्याने घटक पक्षांच्या नेत्यांचा जीव कंठाशी आला आहे. ‘युती तुटली तर आपण काय करायचे?’ असा यक्षप्रश्न त्यांना भेडसावत आहे. म्हणूनच या ‘मोठ्यांच्या’ भांडणात लक्ष घालून छोट्या घटक पक्षांनी शिवसेना- भाजप नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात महायुतीत यशस्वी शिष्टाई करणारा नेताच नसल्याने घटक पक्षांच्या जागांचा तिढा सुरुवातीपासूच वाढत आहे. त्यातच आता शिवसेना- भाजप या प्रमुख पक्षांमध्येच कलगीतुरा सुरू झाला आहे. त्यामुळे आपापल्या मागण्या बाजूला ठेवून रिपाइं व इतर पक्षांनी युतीतील भांडणे मिटविण्यास प्राधान्य दिले आहे.
आठवले- उद्धव ठाकरे भेट
रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागावाटपाचा तिढा लवकर सोडवावा, अशी विनंती केली. जागांच्या वादातून महायुती तुटू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ठाकरे यांचीही महायुती तुटण्याची इच्छा नसल्याचे आठवले यांनी पत्रकारांना सांगितले.

राज्यात १५ वर्षांनंतर महायुतीचे सरकार येण्याची आशा आहे. महायुती भक्कम राहिली तरच हे यश मिळेल व आपल्यालाही सत्तेत वाटाही मिळेल. मात्र, शिवसेना-भाजपचे फिसकटले तर राज्यात पुन्हा आघाडीचेच राज्य येईल, अशी भीती घटक पक्षाचे नेते शिवसेना व भाजपकडे तळमळीने बोलून करत आहेत; परंतु दोन्ही पक्षांचे नेते या छोट्या पक्षांना फारसे महत्त्व देत नाहीत.
सर्वांची धाव ‘मातोश्री’वर
काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागावाटपावरून महायुतीत तणाव होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आपल्यातील दुहीचा आघाडीलाच फायदा होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. त्यापाठोपाठ राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनीही उद्धव ठाकरे यांना भेटून तसे प्रयत्न केले. मात्र, शिवसेना- भाजपमधील तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे युती तुटली तर आपण कोणत्या पक्षाबरोबर जायचे, असा प्रश्नही छोट्या घटक पक्षांसमोर आहे.