मुंबई - ‘अशा अनेक लाटा आम्ही पाहिल्यात’ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदींना उद्देशून केलेले वक्तव्य भाजप नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यातच जागावाटपाच्या बैठकांमध्ये शिवसेनेकडून दुसऱ्या फळीतील नेत्यांना बसवले जात असल्यानेही भाजपमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आता इतर कोणाशीही नाही, तर थेट उद्धव ठाकरेंशीच चर्चा जागावाटपाची चर्चा करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर लगेचच महायुतीचे अंतिम जागावाटप मार्गी लावण्याच्या उद्देशाने रविवारी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि विनोद तावडे ‘मातोश्री’वर गेले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना वेळ न देता खासदार अनिल देसाईंशी चर्चा करा, असे सांगत बैठकीतून काढता पाय घेतला. पक्षप्रमुखांची आज्ञा शिरसावंद्य मानून अनिल देसाईंनीही मग लगेचच "बोला मुनगंटीवार साहेब, कोणत्या जागा हव्यात' अशी चर्चेची सुरुवात केल्याने संतापलेल्या भाजप नेत्यांनी मातोश्रीवरून काढता पाय घेतला.
भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी अंतिम चर्चा करण्याची इच्छा शिवसेनेने वारंवार व्यक्त केल्यानंतरही भाजपचे राज्यस्तरीय नेतेच चर्चेला येत आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे केल्याचे सांगितले जाते.