मुंबई - उत्तरप्रदेश, राजस्थानसह गुजरातमधील पोटनिवडणुकीत भाजपला हादरे बसल्यानंतर राज्यातील महायुतीच्या ताणतणावावर त्याचा थेट फरक पडला आहे. कालपर्यंत अतिशय आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपला आता शिवसेनेसमोर थोडे नमते घेण्याची वेळ येणार आहे. या निकालानंतर भाजप नेत्यांची केवळ भाषाच नव्हे, तर देहबोलीच बदलली. मोदी लाटेच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने महायुतीत आता शिवसेना आक्रमक होणार आहे. दुसरीकडे मनोबल वाढलेली काँग्रेसही राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे चित्र आहे.
नऊ राज्यांतील विधानसभेच्या ३३ जागांच्या पोटनिवडणुकीतील निकालांनी भाजपचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच शिवसेनेवर १४४ जागांसाठी दबाव टाकताना स्वबळाचाही राग आळवणाऱ्या भाजप नेत्यांनी आता तडजोडीची भाषा सुरू केली आहे. मोदी लाटेच्या आधारावर राज्यात बाजी मारता येईल, अशा दिमाखात वावरणाऱ्या भाजपला आता ‘शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ’ ही महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी तयार केलेली घोषणा विजयासाठी पुरेशी ठरणार नाही, असे वाटायला लागले आहे.
शिवसेनेसोबतच्या चर्चेत आजवर ताठर भूमिका घेणाऱ्या भाजपने आता तडजोडीचा पवित्रा घेण्याचे ठरवले आहे. १२० ते १२५ अशा जागांवर तडजोड करण्याची भूमिका आता भाजपला घ्यावी लागेल, तर शिवसेना आता कोणत्याही परिस्थितीत १५० जागांच्या खाली येईल, असे चिन्ह दिसत नाही. एवढेच नव्हे, तर भाजपला प्रचाराची रणनीतीही बदलावी लागेल. ‘कुठे आहे ती मोदी लाट’, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर हल्ला चढवला. मात्र, पोटनिवडणुकीच्या निकालाचा राज्यावर काहीही परिणाम होणार नाही, असा पवित्रा जाहीरपणे भाजपने घेतलाय.
काँग्रेसला उभारी, राष्ट्रवादी तडजोडीच्या तयारीत
‘लोकसभानिवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते नाउमेद झाले होते. मात्र, या निकालांनी त्यांना जोमाने लढण्याचा उत्साह दिला आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आनंद व्यक्त केला. मोदी लाट आता थांबली असून काँग्रेसला पुन्हा संजीवनी मिळत असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे. त्यामुळे कालपर्यंत काँग्रेसबद्दल आक्रमक भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीलाही या निकालाने कठोर संदेश गेलाय. परिणामी स्वबळाच्या बाता मारणारे राष्ट्रवादीचे नेतेही आता काँग्रेससोबत आघाडी करण्याचीच आग्रही भूमिका मांडू लागले आहेत.