मुंबई - महायुतीचे मुख्य आधारस्तंभ शिवसेना-भाजपमध्ये वाढत चाललेल्या तणावामुळे युतीमधील इतर छोटे घटक पक्ष चांगलेच कातवले असून "काहीही करा पण महायुती टिकवा'असा त्यांनी धोशा लावला असून सेना-भाजपमध्ये मध्यस्थाची भूमिका करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना-भाजप या दोघांची राज्यात गेली २५ वर्षापासून युती राहिलेली आहे. मात्र, या वेळी जागावाटपांवरून दोघांत तिढा पडला आहे. दोन दिवसांपासून दोन्ही पक्षांतील नेते स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे महायुतीमधील रिपाइं, शिवसंग्राम, रासप आणि स्वाभिमानी या छोट्या पक्षांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शिवसेना-भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास सर्वाधिक फटका छोट्या पक्षांना बसणार आहे. त्यामुळे इतर घटक पक्ष मध्यस्थांच्या भूमिकेत गेले आहेत. त्याचाच भाग म्हणून सोमवारी रामदास आठवले आणि विनायक मेटे यांनी बैठक घेतली. "काहीही करा पण महायुती म्हणूनच िनवडणुकांना सामोरे जाऊ असे आवाहन केले. रामदास आठवले यांच्या "रिपाइं' पक्षाला ८, महादेव जानकर यांच्या "रासप'ला २, विनायक मेटे यांच्या "शिवसंग्राम' संघटनेस आणि राजू शेट्टी अध्यक्ष असलेल्या "स्वाभिमानी'संघटनेस महायुतीमध्ये विधानसभेच्या जागा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु शिवसेना-भाजप या मुख्य पक्षांतील जागावाटपाचे घोडे अडले आहे. घटक पक्षांना कोणत्या आणि िकती जागा मिळणार याचा निर्णय होत नाही. त्यामुळे छोट्या घटक पक्षांचा जीव टांगणीला लागला आहे.