आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Vilas Undalkar News In Marathi

विलास उंडाळकरांसाठी महायुतीने टाकला गळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने त्यांच्या मूळ गावातूनच म्हणजेच दक्षिण कराडमधून उमेदवारी निश्चित केली असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी टिली. या मतदारसंघातून तब्बल सात वेळा निवडून आलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार विलासकाका उंडाळकर मात्र त्यामुळेच नाराज आहेत. नुकताच त्यांनी बंडाचा इशाराही दिला आहे. त्यामुळेच चव्हाणांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी देण्यासाठी महायुतीने उंडाळकरांना आपल्या गोटात ओढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
निवडणुकीवर डोळा ठेवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या एक वर्षापासूनच दक्षिण कराडमध्ये विकासकामांचा धडाका लावला होता. उंडाळकरांचा विरोध होणार हे गृहीत धरून त्यांनी आपला मतदारसंघ सुरक्षित करण्याचे सर्व प्रयत्न सुरू केले होते. उंडाळकर काँग्रेसचे विद्यमान आमदार असले तरी चव्हाण व त्यांच्यातून विस्तव आडवा जात नाही, हे जगजाहीर आहे. म्हणूनच त्यांचा पत्ता कट करून मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात आपले घोडे दामटल्याचे सांगितले जाते. मात्र, यानंतरही उंडाळकरांनी हार पत्करलेली नाही. काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास आपण अपक्ष लढू, असा जाहीर इशारा त्यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक सशक्त उमेदवार समोर दिसल्याने महायुतीच्या नेत्यांनी उंडाळकरांवर गळ टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
रिपाइंकडून ऑफर
रिपाइंनेही विलासकाकांना ऑफर दिल्याचे समजते. ‘मुख्यमंत्र्यांना शह देण्याची ही चांगली संधी आहे. उंडाळकरांना महायुतीतर्फे उमेदवारी घेता आली नाही तर रिपाइं त्यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा प्रयत्न करील,’ असे एका नेत्याने सांगितले. रामदास आठवले लवकरच उंडाळकरांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
विलासकाकांची संमती
महायुतीच्या घटक पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, दक्षिण कराडमध्ये मुख्यमंत्र्यांना उंडाळकर चांगली टक्कर देऊ शकतात, केवळ टक्करच नव्हे, तर ते मुख्यमंत्र्यांचा पराभवही करू शकतात. त्यामुळेच त्यांना महायुतीमध्ये आणून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढवण्याची योजना आखण्यात आली आहे. आमचे काही नेते त्यांना भेटलेही असून महायुतीच्या प्रस्तावास विलासकाकांनीही संमती दिल्याचा दावा या नेत्याने केला आहे.