आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांच्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब, सिंचनावर उद्या चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. यामुळे आज (सोमवार) सकाळी तासाभरासाठी आणि त्यानंतर दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, विधानपरिषदेत सिंचनाच्या मुद्यावरून मंगळवारी चर्चा करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे दिवाकर रावते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रविण दरेकर यांचे निलंबन आणि सिंचनावरील चर्चेला वेळ देत नसल्यामुळे विधानसभेसह विधानपरिषेदत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदरांनी केला. यामुळे कामकाजाच्या सुरवातीलाच सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे विधानपरिषदेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तर विधानसभेचे कामकाज एक तासासाठी तहकूब करण्यात आले.

तासाभरानंतर पुन्हा कामकाजालासुरवात झाल्यानंतरही विरोधक शांत झाले नाही. विरोधीपक्षाच्या सर्व सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी देत अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत ठिय्या मांडला. यामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्याआधी विधीमंडळाबाहेरील पाय-यांवर विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

आज (सकाळी) नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील चिंचवे गावातील बंधा-याचे काम सुरु असताना बंधारा कोसळला आहे. यावेळी पाटबंधारे विभागाचे पाच अधिकारीही तेथे होते. ते ढिगा-याखाली अडकले असल्याची माहिती आहे. सिंचनाच्या मुद्यावर मंगळवारी विधानपरिषदेत चर्चा होणार आहे. त्यावेळी हा मुद्याही गाजण्याची शक्यता आहे.