मुंबई - बालविवाहाला विरोध करणार्या आणि इतर मुलींनाही या अरिष्टापासून वाचवून सामाजिक बदल घडवून आणणार्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील नऊ रणरागिणींना युनिसेफने शुक्रवारी ‘नवज्योती’ पुरस्काराने गौरवले.
मुंबईतील युनिसेफच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर म्हणाल्या की, कर्तबगार महिलांच्या कर्तृत्वाला राज्यपातळीवर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘नवज्योती’ची संकल्पना राबवली जात आहे. यातून रोल मॉडेल्स उदयास येत असून त्यांनी स्वत:सह सहकारी व समाजात आश्वासक बदल घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांविषयक प्रेरणादायी कार्य करणार्या मुलींना दरवर्षी नवज्योती पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा पुरस्कारांचे दहावे वर्ष आहे.
बेबी उद्धव ठोके (परतूर)
परतूर तालुक्यातील सालगावच्या 14 वर्षीय बेबी उद्धव ठोकेची कहाणीही मोठी प्रेरक. शिक्षण सोडून आजीने तिचे लग्न जमवले. बेबीला शिक्षणाची मोठी ओढ होती. बहिण सविता यांनी बेबीची ओढ ओळखून तिला सहकार्य केले. गाव बालसंरक्षण समिती, स्वराज्य ग्रामीण विकास प्रतिष्ठानकडून पुढाकार घेत परतूर तालुक्यातील अंबा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात बेबीचा प्रवेश निश्चित करण्यात आला.
माधुरी गणेश पवार (जाफराबाद)
जाफराबाद तालुक्याच्या (जि. जालना) निवडुंगा गावातील 17 वर्षांची माधुरी गणेश पवार म्हणाली, तालुक्याला शिक्षण घेण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांना गावातून एकही बस नव्हती. यामुळे सातवीनंतर पालक मुलींचे शिक्षणच बंद करायचे. बर्याच मुलींचे लहान वयातच लग्न लावून दिले जायचे. असे होऊ नये म्हणून मी निवडुंगातील 20 व परिसरातील 4 मुलींना एकत्र करून जिल्हा प्रशासनाकडे बससाठी आंदोलन केले. सरकारी योजनांची माहिती घेऊन अधिकार्यांकडे बससाठी पाठपुरावा केला, त्याला यश आले. विशेष असे की यंदा जुलैपासून आतापर्यंत पंचक्रोशीत एकही बालविवाह झाला नसल्याचे ती म्हणाली.
मानकरी
0 आशा तोंडे 0रोशना मारासकोल्हे 0 मोनिका इसलावत 0सरस्वती सरजे 0 प्रणाली सोनटक्के 0हर्षा कोली 0सुनीता वच्छामी