आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharastra Assembly Mansun Sesion Opposition Leader Ajit Pawar , Jitendra Avhad

दादांचा हंबरडा, आव्हाड रडले ढसाढसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधान भवन इमारतीबाहेर अामदार जितेंद्र अाव्हाड यांनी चिक्की खाण्याचे नाटक रंगवले. - Divya Marathi
विधान भवन इमारतीबाहेर अामदार जितेंद्र अाव्हाड यांनी चिक्की खाण्याचे नाटक रंगवले.
मुंबई- काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी चिक्की खाल्ली आणि ते चक्कर येऊन पडले... "ते आपल्याला सोडून गेले' म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हंबरडा फोडला, तर जितेंद्र आव्हाड महिलांच्या शैलीत छाती पिटत रडू लागले.. अमिन पटेल यांनाही दु:ख अनावर झाले... मंगळवारी विधान भवनात विरोधकांनी भरवलेल्या अभिरूप विधानसभेत हे नाट्य रंगले.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला व विधान भवन इमारतीतच अभिरूप सभागृह भरवले. या वेळी चिक्की घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरण्यासाठी असलम शेख यांनी चिक्की खात असल्याचा अभिनय केला आणि लगेच ते खाली पडले. "चिक्की खाऊन असलम आपल्याला सोडून गेला' असे म्हणत अजित पवारांनी हंबरडा फोडला. हे पाहताच जितेंद्र आव्हाड यांच्यातील अभिनेता जागृत झाला. त्यांनीही छाती पिटत हंबरडा फोडला. काँग्रेसचे अमीन पटेल धावत शेख यांच्याजवळ आले. ‘तुमको मालूम नहीं था क्या? सरकार की चिक्की अच्छी नहीं होती.. क्यूँ खाया.. अल्लाह के लिए उठ जा,' असे म्हणत त्यांनी रडण्याचा अभिनय सुरू केला..
विधान भवन इमारतीतील टिळकांच्या पुतळ्यासमोर विराेधक ठाण मांडून बसले. परळीतून आलेला मुंडे नावाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासारखा दिसतो. हे हेरून त्याला मध्ये बसवण्यात आले आणि अभिरूप विधानसभेचा प्रारंभ झाला. अभिरूप अध्यक्षांकडे बघत जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे या आमदारांनी, ‘अध्यक्ष महोदय आम्हाला बोलू दिले जात नाही’ अशी तक्रार करण्यास प्रारंभ केला. यामुळे हा कार्यकर्ता भांबावला. कुणीतरी जाऊन या अध्यक्षांच्या तोंडाला पट्टी बांधली आणि इतर आमदारांनी ‘विधानसभा अध्यक्षांनी आपले डोळे व तोंड बंद केले आहेत,’ अशी तक्रार केली. माजी मंत्री नसीम खान यांनी तर ‘अध्यक्षांच्या कानातील श्रवणयंत्रच फडणवीस यांनी काढून ठेवल्याने त्यांना ऐकू येत नाही,’ असा टोला लगावला.
माध्यमांच्या कॅमेऱ्यांना या परिसरात प्रवेश नसल्याने आमदारांनीच स्वत:च फोटो काढून माध्यमांना पाठवले. तासभर हे नाट्य सुरू हाेते. नंतर मंत्री प्रकाश मेहता समजूत घालायला आले. मात्र, कर्जमाफी केल्याशिवाय येणार नाही, असे सुनावत त्यांना परत पाठवले. सरकार गंभीर असते तर गटनेत्यांशी चर्चा केली असती, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
उद्धव हमारे साथ है...
हे नाट्य सुरू असतानाच मंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवेश झाला. त्या वेळी ‘यह अंदरकी बात है, उद्धव ठाकरे हमारे साथ है' अशा घोषणा जितेंद्र अाव्हाड व इतर आमदारांनी दिल्या. मिलिंद कदमप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.