आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharshtra Government DCM Pawar Latest News Marathi

उपमुख्यमंत्र्यांची आई, भावाला गारपिटीची 43 हजार भरपाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्यातील हजारो शेतकरी उद्ध्वस्त झाले. त्यांच्या जखमांवर फुंकर घालत सरकारने नुकसान भरपाईचे आश्वासन दिले असले तरी अद्यापही अनेक शेतकरी त्यापासून वंचितच आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि बंधू श्रीनिवास पवार यांच्या बँक खात्यात मात्र 43 हजार रुपये भरपाई जमा झाली आहे.
बारामती तालुक्यात (जि. पुणे) काटेवाडी पवार कुटुंबियांचे गाव आहे. अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंत पवार यांच्या नावावर 0.85 हेक्टर शेतजमीन आहे, तर बंधू श्रीनिवास अनंत पवार यांच्या नावावर 2 हेक्टर शेतजमीन आहे.
सरकारने कोरडवाहू शेतीला प्रतिहेक्टर 10 हजार तर सिंचनाची सोय असलेल्या शेतीला 15 हजार रुपयांची भरपाई गारपीटनंतर जाहीर केली आहे. तर बागायतीसाठी हेक्टरी 25 हजारांची सरसकट भरपाई देण्यात येत आहे. पुणे जिल्हा बँकेच्या काटेवाडी शाखेत आशाताई पवार यांच्या खात्यात सरकारतर्फे गारपीटीची भरपाई म्हणून 13, 050 रुपये तर श्रीनिवास पवार यांच्या खात्यामध्ये 30,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
चार हजार कोटींचे पॅकेज
फेब्रुवारीमध्ये राज्यात गारपीट झाली होती. त्यामध्ये 28 जिल्ह्यातील 20 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपीकाचे नुकसान झाले होते. लोकसभा निवडणुकांमुळे देशात आचारसंहिता होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेऊन शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने 4 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. भरपाई देण्याची घोषणा तत्काळ झाली मात्र महसूल यंत्रणेने पंचनामे करण्यात वेळकाढूपणा केला. आजमितीस पहिल्या यादीचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र दुसर्‍या आणि तिसर्‍या यादीतील शेतकरी भरपाईची वाट पाहात आहेत.
पवारांचा आदर्श
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या शेतीचे गारपिटीने नुकसान झाले होते, मात्र त्यांनी भरपाई नाकारली. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात रकमा वर्ग करण्यात आल्या नसल्याचे बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले.
पैसे परत करणार
उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांनी गारपीट नुकसान भरपाईची मागणी केली नव्हती. इतरांप्रमाणे त्यांनाही भरपाई मिळाली, परंतु या मदतीचे सर्व पैसे पवार कुटुंबीय शासनाला परत करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.