आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीवाटपाच्या प्रश्नावर दोन दिवसांत तोडगा, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; बहिष्कार मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निधीवाटपात विरोधी पक्षांना डावलले जात असल्याच्या मुद्द्यावरून बुधवारी दिवसभर विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार्‍या विरोधकांनी गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कामकाजावरील बहिष्कार मागे घेतला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात सांगितले की, दोन तृतीयांशपेक्षा जास्त विकास निधीचे वाटप नियमाप्रमाणेच होते. उर्वरित निधीचे वाटप आमदारांच्या मागण्यांप्रमाणे होते. प्रत्येक मतदारसंघात निधीवाटप झालेले आहे. परंतु, तरीही काही मतदारसंघांबाबत अन्याय झाला असल्यास ही बाब आमदारांनी निदर्शनास आणून द्यावी. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल. तसेच, याबाबत दोन दिवसांत माहिती घेऊन निधीवाटपाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर दीडच्या सुमारास विरोधक पुन्हा कामकाजात सहभागी झाले. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत निधीवाटपाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे ठरले आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली.

युतीच्या काळातील चौकशी व्हावी : सत्तार
युतीच्या काळातील विकास निधी वाटपाचीदेखील चौकशी व्हावी, अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली. या मागणीला सत्ताधारी आमदारांनी साथ दिली. तेव्हा युतीच्या काळात निधीवाटप व मागील तीन वर्षांच्या काळातील निधीवाटप यांचा अहवालच आपण सादर करू. तेव्हा निधीवाटपावरून कुणावर अन्याय झाल्याचे निदर्शनास आल्यास आम्हाला एक रुपयाही देऊ नका, असे प्रत्त्युत्तर खडसे यांनी दिले.