आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीवनदायी’ला महात्मा फुलेंचे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गरिबांना वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून राज्यात सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव आता महात्मा फुले जनआरोग्य योजना करण्यात आले असून यामध्ये अनेक नवीन सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनांना मंजुरी देण्यात आली.

राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा विचार आरोग्य विभागाने केला होता. परंतु काँग्रेसने यास विरोध केल्यानंतर ‘बहुजन कार्ड’ची खेळी करत सरकारने या याेजनेला महात्मा फुले यांचे नाव दिल्याचे बोलले जाते. मात्र, आरोग्यमंत्र्यांनी याचा इन्कार केला. ‘योजनेशी निगडित विमा कंपनीचे कंत्राट नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यानंतर नव्या नावाने व नव्या स्वरूपात ही याेजना आणण्यात येईल,’ असे ते म्हणाले.

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, ‘सध्याच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेत विविध ९७१ आजार व शस्त्रकिया करण्यात येत होत्या. तसेच दीड लाखापर्यंतचाच खर्च दिला जात होता. या योजनेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने ही योजना नव्याने आणण्यात येत आहे. महात्मा फुले यांचे १२५ वे स्मृती वर्ष असल्याने त्यांच्याच नावाने ही योजना आता आणण्यात येणार असून यात १०३४ आजार व शस्त्रकियांचा समावेश करण्यात आलेला आहे. गुडघा पुनर्रोपण आणि उखळीचा सांधा पुनर्रोपण (हिप जॉइंट रिप्लेसमेंट), दातांवरील उपचार, पेडियाट्रिक आणि वार्धक्यामधील आजारांवरही उपचार यात केले जाणार आहेत. अगोदर खर्चाची मर्यादा दीड लाख होती, ती आता दोन लाख करण्यात आली असून मूत्रपिंड प्रत्यारोपणाकरिता तीन लाख रुपये दिले जाणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त रुग्णालये या योजनेअंतर्गत आणण्यात येणार असून डोंगराळ भागात रुग्णालयांकरिता असलेली ५० खाटांची क्षमता कमी करून २० खाटांची करण्यात आली आहे. जी रुग्णालये ही योजना राबविण्यास नकार देतील, त्यांच्यावर आर्थिक दंडासह इतर कारवाईदेखील करण्यात येणार आहे. या विमा योजनेचा लिलाव करण्यात येणार आहे.’

जखमींचा ३० हजारांपर्यंत उपचार खर्च
राज्यातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशनकार्डधारक अपघातग्रस्तांवर पहिले तीन दिवस मोफत उपचार करण्यात येणार असून त्याच्या खर्चाची मर्यादा ३० हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे. राज्यातील ट्रॉमा केअर रुग्णालयांना यात जोडून घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमधील जखमींसाठी गोवा, तर कोल्हापूरमधील जखमींसाठी बेळगावमधील रुग्णालयातही उपचार करण्याची सोय या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...