आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 हजार कोटींचा ‘महावितरण’कडून भ्रष्टाचार, वीज संघटनेचे प्रताप होगाडे यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील शेतक-यांचे वाढीव वीज बिल दाखवून सरकारी अनुदान हडप केले तसेच वीजगळतीची सबब पुढे करत दरवाढ करून ‘महावितरण’ने राज्यातील जनतेची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.


राज्यातील शेतक-यांचा खरा वीज वापर कमी असूनही दुप्पट, तिप्पट वापर दाखवून बिलांवरील राज्य सरकारचे अनुदान हडप केले जाते. दुसरीकडे वीजगळतीची रक्कम दरवाढ करून सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूल केली जाते. हा ‘महावितरण’चा सिंचन घोटाळ्याच्या तोडीचा महागळती घोटाळा आहे. दरवर्षी किमान 10
टक्के जरी गळती गृहीत धरली तरी गेल्या 13 वर्षांत वीज ग्राहकांची किमान 53 हजार 500 कोटी रुपयांची लूट करण्यात आली आहे व राज्य सरकारचे सुमारे साडेसहा हजार कोटींचे अनुदान हडपण्यात आले आहे. हा भ्रष्टाचार करताना शेतक-यांचा वीज वापर जास्त दाखवून त्यांना मात्र नाहक बदनाम करण्यात आले, असा दावा
होगाडे यांनी केला. हे आरोप नाकारण्यासाठी सरकारने त्रयस्थ यंत्रणेमार्फत राज्यातील 36 लाख शेती पंपांची पटपडताळणी करावी व सत्य जनतेसमोर आणावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.


दरवाढ देऊ नका !
केंद्र सरकारने नेमलेल्या शुंगलू समितीनेही शेतक-यांचा वीज वापर वाढवून दाखवण्यात येतो व वीजगळतीसाठी सरकारी अनुदान वापरण्यात येते, असे अहवालात नमूद केले होते. वीज ग्राहक संघटनेने या बाबी पुराव्यांसह विद्युत नियामक आयोगासमोर मांडल्या आहेत. सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत ‘महावितरण’ला दरवाढ देऊ नये, अशी मागणी होगाडे यांनी केली.