आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahayuti Election Manifesto News In Divya Marathi

महाराष्ट्र टोल-एलबीटीमुक्त करणार; महायुतीच्या वचननाम्यात आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर महायुतीच्या वचननाम्याला मुहूर्त मिळाला आहे. राज्य एलबीटी-टोलमुक्त करण्याबरोबरच अन्न सुरक्षा योजनेत सुधारणा, शिवस्मारकाच्या रखडलेल्या परवानग्या, मनरेगाचे निकष बदलणार यासारख्या काँग्रेस आघाडीच्याच काही योजनांमध्ये सुधारणा करून त्या पुढे नेण्याचे आश्वासन त्यात देण्यात आले आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीतल्या मदतीचे निकष बदलणे, रेणके आयोगाच्या शिफारशी लागू करणे यासारख्या लोकप्रिय आश्वासनांचाही त्यात समावेश आहे. लवकरच हा वचननामा जाहीर होईल.

राज्यातील दुसर्‍या टप्प्यातले मतदान अवघ्या चार दिवसांवर आलेले असतानाही अजून महायुतीने आपला जाहीरनामा प्रकाशित केलेला नाही. महायुतीच्या सहा प्रमुख नेत्यांच्या एकत्रित वेळा मिळत नसल्यामुळे याचे प्रकाशन लांबणीवर पडत असल्याची माहिती शिवसेनेच्या एका नेत्याने दिली. या वचननाम्याची एक प्रत प्रकाशनापूर्वीच ‘दिव्य मराठी’ला प्राप्त झाली आहे.

वचननाम्याच्या पहिल्याच पानावर राज्यातल्या महापुरुषांच्या स्मारकांना स्थान देण्यात आले आहे. सामाजिक न्यायाची आपली भूमिका स्पष्ट करताना महायुतीने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी शेफर्ड कमिशनची स्थापना करण्याचे ठरवले आहे. तसेच ‘धनगर’ऐवजी ‘धनगड’ असा शब्द असल्याने अनुसूचित जातीत असूनही या समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याकडे लक्ष वेधत ते आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी रेणके आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू करणार, दलित आणि महिला अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करण्याचेही वचननाम्यात म्हटले आहे.

सर्वच मित्रपक्षांची काळजी
महायुतीच्या वचननाम्यात सगळ्या मित्रपक्षाच्या अजेंड्याचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी धनगर समाजाशी संबंधित मुद्दय़ांचा अंतर्भाव यात आहे. स्वाभिमानी श्ेातकरी संघटनेसाठी जिव्हाळ्याचा असलेला स्वामिनाथन आणि रंगराजन समितीच्या शिफारशींचा मुद्दाही समाविष्ट करण्यात आला आहे. मेटेंसाठी शिवस्मारकही आहे, तर आठवलेंसाठी दलित अत्याचारविरोधी कायद्यांचा विचारही यात करण्यात आला.

वचननाम्यातील मुद्दे
- रखडलेल्या शिवस्मारकाच्या उर्वरित सर्व परवानग्या मिळवणार
- इंदू मिलमधल्या डॉ. आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला वेग देणार
- स्वामिनाथन समिती आणि रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करणार
- नैसर्गिक आपत्तीत शेतकर्‍यांना मिळणार्‍या मदतीबाबतचे कालबाह्य निकष बदलणार
- मनरेगाचेही अनेक निकष बदलून योजना अधिक सुटसुटीत, भ्रष्टाचारमुक्त आणणार
- नगर- बीड- परळी आणि वर्धा - यवतमाळ - पुसद - नांदेड या दोन रेल्वेमार्गांसाठी पुरेसा निधी आणण्याचे प्रयत्न.
- विदर्भातले शकुंतला रेल्वे रुंदीकरण आणि इतर सहा रेल्वे प्रकल्पांनाही प्राधान्याने निधी देणार.