आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahayuti Leaders Meeting At Rangsharda, Mumbai, Athavale Upset

आठवले नाराज, घटकपक्षांची सटकली; 2 दिवसांत निर्णय घ्या अन्यथा स्वतंत्र लढू- शेट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महायुतीतील जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर संपवावा अशी विनंती करण्यासाठी गेलेल्या छोट्या घटकपक्षांना भाजपने महत्त्व देण्याची तसदी घेतली नाही. दुपारी तीनची भेटीची वेळ देऊनही भाजपचे नेते बैठकीच्या ठिकाणी हजर न झाल्याने अखेर रामदास आठवले नाराज होऊन तेथून निघून गेले तर, पाचच्या सुमारास भाजप नेत्यांत राजू शेट्टी व महादेव जानकर यांच्यात बैठक झाली आहे. या भेटीत भाजपने आपला हट्टाहास सोडावा व महायुतीतील जागावाटप तत्काळ करावे, अशी मागणी केली. दोन दिवसात युतीबाबत व जागावाटपांबाबत निर्णय घ्या नाहीतर आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशारा राजू शेट्टींनी सेना-भाजपला दिला आहे. दरम्यान, भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर महादेव जानकर व राजू शेट्टी पुन्हा एकदा मातोश्रीवर उद्धव यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टींसह सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्याआधी काल आठवलेंनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर हे नेते भाजपच्या नेत्यांना भेटणार होते. आज दुपारी तीन वाजता भेट ठरली होती. मुंबईतील रंगशारदा येथे ही बैठक होणार होती. मात्र, एक तास झाले तरी एकही भाजपचा नेता तिकडे फिरकला नाही. त्यामुळे आठवले रागाने निघून गेले. दुसरीकडे, राजू शेट्टी व महादेव जानकर हे तेथे थांबून राहिले.
भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी भाजपचे नेते तीनपासून हजर होते. मात्र, शहा यांनी मुंबईत पोहचताच स्वागत स्वीकारले व थेट एका खासगी बैठकीला निघून गेले. त्यानंतर भाजप नेते रंगशारदाच्या दिशेने रवाना झाले. त्यांची वाट पाहत बसलेले नेत्यांशी त्यानंतर बैठक सुरु झाली. ही बैठक अर्धा-पाऊण तास चालली. युती टिकविण्याकडे आमचा कल असल्याचे भाजपच्या नेत्यांनी घटकपक्षांना सांगितले.
शहांची खासगी बैठक कोणासोबत?- अमित शहांचे मुंबईत बरोबर 4 ला आगमन झाले. भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर ते व्हीव्हीआयपी गेटने बाहेर पडले. इकडे भाजप नेत्यांनाही ते कोठे जाणार आहेत याची कल्पना नव्हती. नियोजित कार्यक्रमानुसार ते रंगशारदात येणार होते. मात्र, ते एका गुप्त व खासगी बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात येते. ही गुप्त भेट कोणासोबत याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, याबाबत सांगितले जात आहे, राज्यातील राजकीय स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी एका उद्योगपतीच्या भेटीसाठी ते गेले आहेत. त्याच्यासमवेत काही मोजके नेते असल्याचे कळते. शिवसेनेसोबतची युती तोडली तर त्याचे काय पडसाद पडतील आणि भविष्यात काय परिणाम होतील याची माहिती या गुप्त बैठकीत घेणार असल्याचे कळते.