आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahayuti Seat Sharing For Upcoming Assembly Election Preparation

युतीसाठी घटकपक्ष ठरताहेत गळ्यातील \'लोढणे\', 25 ते 27 जागा देण्याचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 15 वर्षाच्या सत्तेला जनता कंटाळली असून, महायुती सत्तेवर येईल असे सर्वत्रच बोलले जात आहे. मात्र, महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना व भाजपला आपले इतर मित्रपक्ष हे गळयातील लोढणे वाटू लागले आहेत. महायुतीतील घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय व शिवसंग्राम या पक्षांनी सुमारे 100 पेक्षा जास्त जागांची मागणी केल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत हे पक्ष महायुतीसोबत होते. मोदी लाटेसह राज्यात सामाजिक समीकरण जुळवत महायुतीने 48 पैकी 42 जागा जिंकल्या. त्यामुळे आता अशा स्थितीत या घटक मित्रपक्षांना सोडून देणे अडचणीचे ठरू शकते. याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादीने चौथ्यांदा सत्ता आणायचीच असा चंग बांधला आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी भाजप-सेनेचे नेते बैठका घेऊ लागले आहेत. त्यानुसार या चार घटक पक्षांना किमान 25-27 जागा सोडण्याचा विचार सुरु आहे. या छोट्या पक्षांना जागा देण्याबाबत युतीतील नेत्यांना अडचण नाही मात्र त्यांची जिंकण्याची क्षमता किती या निकषावरून खल सुरु आहे.
खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या संघटनेला किमान 35-40 जागा मिळाव्यात असे म्हटले आहे. महादेव जानकर व आठवले यांनीही आपापल्या पक्षांना किमान 20 जागा मिळाव्यात असे म्हटले आहे. शिवसंग्रामने आकडा सांगितला नसला तरी त्यांची 6-7 जागांवर लढण्याची तयारी सुरु आहे. मात्र, या घटक पक्षांची संबंधित मतदारसंघात ताकद असल्याचे भाजप-सेना नेत्यांना मान्य आहे मात्र निवडून येण्याची शक्यता किती आहे यावर त्यांचा भर आहे. आम्ही तुमची ताकद नाकारत नाही पण महायुतीतील जागावाटप जिंकण्याच्या निकषावरूनच ठरविले जावे असे युतीतील नेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत घटकपक्षांकडून कोणतेही टोकाची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, जागावाटपासोबतच सत्तेत वाटा मिळावा व सन्मानाने वागवले पाहिजे अशी अपेक्षा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युती या घटकपक्षांना 25 ते 27 जागा सोडू शकते. या जागांसुद्धा त्यांना 'जिंकण्याचा निकष' पाहता जास्त वाटत आहेत. पण आपण काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी एकत्र आलो आहोत याची जाणीव भाजप-सेनेसह घटकपक्षांना असल्याने फार ताणले जाईल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत आठवलेंच्या पक्षाला 10-11, शेटटींच्या पक्षाला 8-9, जानकरांना 6-7 व शिवसंग्राम 2-3 जागा सोडण्याचा विचार युतीतील नेत्यांमध्ये आहे. 2009 साली शिवसेनेने 171 जागा तर भाजपने 117 जागा लढविल्या होत्या. नव्या सूत्रांनुसार, शिवसेनेच्या 20 च्या आसपास तर, भाजपच्या 7 जागा कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महायुतीचे जागा वाटपाचा नवा फॉर्म्यूला तयार होऊ शकतो. त्यानुसार शिवसेना 151, भाजप 110 व उर्वरित जागा इतर घटक पक्षांना सोडल्या जातील. मात्र, घटकपक्षांना याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. तसेच घटकपक्षांची जागा वाटपाबाबत अंतिम भूमिका काय आहे यावरून पुढील रणनिती वापरण्याचे युतीने ठरविले आहे.
पुढे आणखी वाचा, महायुतीतील जागावाटपाच्या त्रांगड्याबाबत...