मुंबई - ‘सायबर क्रांती अतिशय वेगाने होत आहे. पण, त्याच वेगाने सायबर गुन्हे नियंत्रित करण्यासाठी
आपल्या क्षमता वृद्धिंगत कराव्या लागणार आहेत. अनेक व्यवहार ऑनलाइन करून आपण कॅशलेस व्यवहारांकडे जात आहोत. पण, सायबर गुन्ह्यांमुळे समाज ‘कॅशलेस’ होणार नाही, याकडेही आपल्याला लक्ष पुरवावे लागेल,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
गृह विभाग, सायबर क्राइम विंग, मुंबई पोलिस, आयआयटी, मुंबई व एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ यांच्या वतीने साेमवारी अायाेजित ‘कॉन्फरन्स ऑन सायबर क्राइम कंट्रोल’मध्ये ते बाेलत हाेते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘आर्थिक गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे उद्योगधंद्याच्या वाढीसाठी अधिकाधिक अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे आवश्यक असताना सायबर क्षेत्रातील गुन्हे घडू नयेत, याची काळजी घेणेही आवश्यक आहे. हे लक्षात घेऊनच शासनाने प्रत्येक नागरिकाला डिजिटल साक्षर करण्यासाठी पावले उचलली आहेत. बँकिंग क्षेत्राने सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या वापराचे चांगले परिणाम खालपर्यंत पोहोचत असताना त्यांना एक सुरक्षित प्लॅटफॉर्मही द्यावा लागेल,’ अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.