आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक इन इंडियाच्या पासेससाठी खासदार, आमदारांची धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून मुंबईत होणाऱ्या "मेक इन इंडिया'कडे पाहिले जात आहे. शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद््घाटन हाेत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अनेक खासदार, आमदार प्रयत्न करत अाहेत. मात्र, फक्त मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनाच कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांना पाच पास, तर उद्योगमंत्र्यांना तीन पास दिले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर जाण्याची संधी मिळावी, असे अनेकांना वाटत आहे. परंतु पासेसच नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे पास मिळावेत म्हणून सकाळपासून अनेक आमदार आणि खासदारांनी फोन करून भंडावून सोडले आहे. बीकेसीतील कार्यक्रमासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून नावे मागवण्यात आली होती. नावे पाठवूनही काही नावे अंतिम यादी तयार करताना गाळण्यात आलेली आहेत. त्यामुळे कमी पासेस उपलब्ध झाल्याने ज्यांना पास मिळाले नाहीत, ते पाससाठी भंडावून सोडत आहेत, तर ज्यांना पास मिळाले आहेत ते आपल्या मित्र, नातेवाइकांसाठी पास द्यावेत म्हणून मागणी करत आहेत.

संध्याकाळी एनएससीआय येथील कार्यक्रमासाठी अडीच हजार पासेस देण्यात आले असून याची यादी खूप अगोदरच देण्यात आली होती. उद्योग विभागाने २०० पासेस मागितले होते, परंतु फक्त ११० पासेसच मिळाले. मुंबईतील सर्व खासदारांना या कार्यक्रमाचे पासेस देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानेही फक्त निवडक लोकांचीच नावे पाठवलेली असल्याने त्यांचेच पास तयार करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना ठरावीक पासेस देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुरक्षेच्या कारणामुळे इतरांना प्रवेश नाहीच
पंतप्रधान बीकेसीमध्ये सकाळी ११ वाजता "मेक इन इंडिया' सप्ताहाचे उद््घाटन करणार असून दुपारी २.३० वाजेपर्यंत सर्व स्टॉल्सना भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छाही अनेकांनी दर्शवली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमाला सगळ्यांनाच प्रवेश दिला जाणार नाही. फक्त मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उपस्थित राहणार आहेत.