आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थर्माकाेल कारखान्याला ठाेकले टाळे; केली पर्यावरणस्नेही मखर निर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पूर्वी मखरांच्या निर्मितीच्या वेळेस राेज एक ट्रक थर्माकाेल जाळावा लागायचा. २६ वर्षे हे ‘पाप’ घडत हाेते. या काळात कार्बनचे लाखाे कण परिसरात पसरले. पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास झाला. मन विषण्ण झाले. मात्र एका घटनेनंतर पर्यावरण ऱ्हासाची जाणीव झाली अाणि थर्माकाेलचा कारखाना बंद करून  पर्यावरणपूरक मखर निर्मितीचा विडा उचलला....  मुंबईतील प्रसिद्ध मखर कलावंत नानासाहेब शेंडकर यांची ही कथा.   

जे. जे. स्कूल अाॅफ अार्टमधून प्रथम श्रेणीची पदवी संपादन केलेल्या शेंडकर यांनी १९७६ मध्ये मुंबईत पहिल्यांदा थर्माकाेल मखर सादर केले. या मखरांची वाढती मागणी बघून त्यांनी १९८५ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या लाेणी-मावळा गावातील अापल्या ५० एकर शेतावरील दाेन एकर जागेवर थर्माकाेल मखर बनवण्याचा कारखाना सुरू केला. ‘पर्यावरणाचे संवर्धन करायला हवे असे पहिल्यापासून वाटत हाेते. कारखान्यातील थर्माकाेलच्या तुकड्यांमुळे शेतीच्या अासपासचे अाेढे, नाले, विहिरी, गाेठे भरून जायचे. राेज एक ट्रक थर्माकाेल जाळल्यामुळे परिसरात कार्बनचे कण पसरून त्रासही हाेत हाेता. मखराच्या कलाकृती चांगल्या हाेत असल्या तरी अापल्याकडूनच पर्यावरणविराेधी कृत्य हाेत असल्याची जाणीव मला हाेत हाेती. पण त्या वेळी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने काही उपाय नव्हता. १५ वर्षे हा व्यवसाय चांगला सुरू हाेता. पण अचानक २००० मध्ये  मुंबईत  ज्या ठिकाणी कलाकृती ठेवण्यात येत असत त्या गणेश गल्लीतील कारखान्याला अागीत निम्म्या कलाकृती जळून खाक झाल्या. याच घटनेनंतर अात्मपरीक्षण करत  पर्यावरणाची हानी करणाऱ्या थर्माकाेलच्या कारखान्याला कायमचे टाळे लावून पर्यावरणपूरक वस्तूंपासून मखर बनवण्याचा निर्णय घेतला,’ असे शेंडकर यांनी सांगितले.   

‘त्या काळी प्रदूषण, पर्यावरणसारखे विषय संवेदनशील नव्हते. त्यामुळे पर्यावरणस्नेही मखरांच्या निर्मितीच्या माझ्या विचारांवर टीकाही झाली. मात्र तरीही जंगलात जाऊन बांबूच्या कामट्या अाणि त्यावर टेंभुर्णीची पाने लावून मखर करण्याचा प्रयत्न केला. मात्र असे मखर करण्यासाठी कुशल कारागीर नसल्याने प्रशिक्षण देण्याचा प्रयत्नही व्यर्थ गेला. त्यानंतर रिसायकल पुठ्ठे घेऊन सजावटीचे पॅटर्न तयार केले. पण थर्माकाेलसमाेर त्याचा टिकाव लागला नाही. सतत प्रयत्न केल्यानंतर काही वर्षांनी अखेर थ्रीडी प्रिंटिंग पुठ्ठ्यांचा पर्याय  उपयाेगी ठरला. नेपथ्यकार म्हणून काम केल्याचा अनुभव कामी अाला. नाटकाच्या जुन्या सेटच्या रंगीत चित्रांच्या प्रती काढून त्यांना थ्रीडी इफेक्ट दिला. स्टेजक्राफ्टमध्ये डिप्लाेमा केल्याने या नाजूक मखरांमध्ये अचूकता येऊ शकली. त्यामुळे उत्तम डिझाइन व अाकर्षक रंगसंगतीच्या माध्यमातून कलात्मक पुठ्ठ्याच्या मखरांची निर्मिती सुरू झाली,’ असे शेंडकर सांगतात.  
 
दिव्‍य मराठी अभियान: मातीची गणेशमुर्ती बसवा
प्रत्येकाने  मातीची, कागदाची गणेशमूर्ती घ्यावी; पण ती पाच फुटांपर्यंतच असावी, थर्माकाेलला नकार द्या, असे शेंडकर अावर्जून सांगतात. त्यांच्या या पर्यावरणपूरक चळवळीमुळे मुंबईतल्या सात हजार गणपती मंडळांपैकी दीड हजार मंडळांनी पर्यावरणपूरक मखरांची कास धरली अाहे. लहान मुलांना पर्यावरणपूरक मखर निर्मितीची कला शिकवण्याचा मानस व्यक्त करतानाच  ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे पुठ्ठ्यांच्या मखर निर्मितीसाठी संशाेधन प्रकल्प उभारण्याचा  विचारही शेंडेकर यांनी व्यक्त केला.
 
थर्माकाेलपेक्षा स्वस्त मखर 
माझ्या कंपनीचा मूळ व्यवसाय साइनएज तयार करण्याचा. २०० कामगार काम करतात. गेल्या महिन्यापासून ते पुठ्ठ्याचे मखर करण्याच्या कामात गुंतले अाहेत. थर्माकाेलच्या तुलनेत पुठ्ठ्याचे मखर तयार करण्यासाठी बराच वेळ लागताे. पण तरीही मी याकडे व्यावसायिक दृष्टिकाेनातून कधीच बघितले नाही. थर्माकाेल मखरांच्या तुलनेत या मखरांची किंमत कमी ठेवली तरच खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक मखरांना चालना मिळू शकेल, असे शेंडेकर सांगतात.   
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...