आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावचे आमदार मौलाना इस्माईल यांचा 24 नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तिसरा महज पक्षाचे प्रमुख व जनसुराज्य आघाडीचे मालेगाव 'मध्य'मधील आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल आणि ठाण्याचे काँग्रेसचे माजी महापौर नहीम खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर मौलाना यांनी आपला तिसरा महज पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला. याचबरोबर मालेगावमधील 24 नगरसेवकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबईत राष्ट्रवादी भवनात झालेल्या छोटेखानी पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते.
आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील नेत्यांशी त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत व पक्षाच्या विलीनीबाबत नुकतीच सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. राष्ट्रवादीतर्फे आपणांस भेटीचे निमंत्रण आल्याने आपण पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, छगन भुजबळ आदी नेत्यांशी चर्चा केली. यावेळी आपल्याला पक्षप्रवेशाचे निमंत्रण देण्यात आले. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सत्तेला साथ देणे गरजेचे आहे. आपण मालेगावचे स्थानिक विकासाचे प्रश्‍न सोडविण्याचे साकडे पवार यांच्यासह नेत्यांना घातले असून त्यांनी विकास करण्याचा शब्द आपणास दिला असल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मौलाना मुफ्ती यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे मालेगावमधील राष्ट्रवादी- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बैचेनी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतर्फे अब्दुल मालिक युनूस ईसा तर काँग्रेसतर्फे आसिफ शेख यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून मागील एक वर्षापासून तयारी सुरू केली आहे. मालिक व आसिफ हे दोघे इच्छुक उमेदवार प्रचारात खूप पुढे गेले असल्याने माघारीची शक्यता कमी मानली जात आहे. याचा आघाडी कसा तिढा सोडविणार याकडे लक्ष असेल.