आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malnutrition Eradicats Health Minister Deepak Sawant

कुपोषण दूर करण्याचे आव्हान स्वीकारतो- आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात १९९३ पासून मोठ्या प्रमाणात समोर आलेला कुपोषणाचा प्रश्न अद्याप पूर्ण सुटलेला नाही. मेळघाटात हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून जून ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान एकूण ३३,४१३ बालकांपैकी तीव्र कमी वजनाची २९८५ बालके आढळून आली आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याबरोबर मेळघाटाचा दौरा करताना यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद त्यांच्या शब्दांत...

- आकडेवारीचे खेळ करत कुपोषण संपल्याचा दावा सरकारकडून नेहमी करण्यात येतो. मात्र, वास्तव वेगळेच आहे. यावर तुमचे काय मत आहे
मी स्वत: डॉक्टर असून गेली अनेक वर्षे आदिवासी, दुर्गम भागात फिरत असल्याने मला येथील वास्तवाची जाणीव आहे आणि म्हणूनच मी कुपोषण नसल्याचा दावा करत नाही. राज्यात कुपोषण आहे, पण ते दूर करण्याचे मी आव्हान म्हणून स्वीकारतो.
- कुपोषणाची मुख्ये कारणे काय आहेत
अज्ञान, स्थलांतर, अपु-या सोयीसुविधा, रोजगाराचे प्रश्न, दळणवळण साधनांची कमतरता, अशी अनेक कारणे कुपोषणाला कारणीभूत आहेत. मात्र, फक्त आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार नाही. कारण आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तात्पुरती मलमपट्टी असेल. त्यामधून हा प्रश्न समूळ नष्ट होणार नाही. रोजगार, सोयीसुविधांमुळे तो वर डोके काढतच राहणार. कुपोषण महिला बालकल्याण, आदिवासी विकास, रोजगार हमी योजना अशा विविध खात्यांचा समन्वय साधूनच या समस्या सोडवता येतील. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विविध खात्यांचे मंत्री यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यामधून मार्ग काढता येईल.
- स्थलांतरामुळे कुपोषण होते, यावर काही प्रकाश टाकता येईल का
रोजगाराच्या शोधात मेळघाटातील आदिवासी मध्य प्रदेश, गुजरात तसेच महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जात असतात. यामुळे मुलांच्या आहाराची प्रचंड आबाळ होते. त्यांची वाढ होईल, असा आहार त्यांना मिळत नाही. राज्याकडून दिला जाणा-या आहारामार्फत सहा वर्षांपर्यंतची बालकांची ब-यापैकी वाढ होऊ शकते. पण, इतरत्र गेल्याने तो त्यांना मिळत नाही. रोजगार संपल्यानंतर ते आपल्या गावी मेळघाटात परततात तेव्हा मुलांचे वजन अतिशय कमी झालेले असते. ती फार काळ जगू शकत नाही आणि बालमृत्यूचा आकडा वाढत जातो, हे वास्तव आहे.
- मेळघाट तसेच राज्यात एनजीओ आरोग्य क्षेत्रात काम करतात. पण, यात ताळमेळ दिसत नाही.
लवकरच मी एनजीओंची बैठक घेणार आहे. तसेच टाटा, जिंदाल, रिलायन्ससारख्या नामांकित कंपन्यांना काही गावे दत्तक देता येतील का, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यांच्याकडे असलेला निधी कुपोषणासारखे गंभीर प्रश्न असलेल्या गावांवरच खर्च कसा होईल, याकडे लक्ष देण्यात येईल.
- तुमच्या समोर कोणती आव्हाने उभी आहेत
राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सुरळीत आणि सुसज्ज ठेवणे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यादृष्टीने पहिले काम असेल ते डॉक्टरांची रिक्त पदे भरणे. तसेच आरोग्य विभागातील इतर पदे भरण्याचाही आमचा भर राहील.
खात्री बाळगा की पुढील पाच वर्षांच्या काळात आरोग्य यंत्रणा सुदृढ झालेली असेल.