सिंधुदुर्ग - 'किल्ला विकणे आहे'अशा आशयाचे बँनर लावण्यात आल्याने मालवण शहरात खळबळ उडली आहे. बसस्थानक, तारकर्ली नाका व म्हाडगुत फोटो स्टुडिओ या 3 ठिकाणी लावलेल्या बॅनर्सची पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने संबंधित बॅनर जप्त केले असून ते लावणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरातील किल्लेप्रेमी, किल्ले प्रेरणेत्सोव समिती आणि वायरी ग्रामपंचायत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर प्रेरणोत्सव समितीच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी दिसून आलेले हे बॅनर रविवारी रात्री लावण्यात आले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे बॅनर कुणी आणि कशासाठी लावले याबाबत अद्याप कळू शकलेले नाही.
मालवण शहर बंदला अल्प प्रतिसाद
वादग्रस्त बॅनरच्या विरोधात बुधवारी १० मे रोजी मालवण शहर बंदची हाक दिली होती. किल्ले सिंधुदुर्ग ही मालवणसह संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. या अस्मितेला धक्का पोहोचवणारे फलक लावणाऱ्या विकृत प्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसह संघटनांनी बंदचे आवाहन केले तरीही या बंदला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.