आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषाचा प्याला : दारूचा कच्चा माल गुजरातेतून, मास्टरमाइंडला राजकीय वरदहस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील मालवणी येथे घडलेल्या विषारी दारूकांड प्रकरणातील मुख्य आरोपी मन्सूर खान ऊर्फ आतिक याच्या अटकेने मुंबई आणि गुजरातदरम्यानचे चोरट्या गावठी दारूचे कनेक्शन उघड झाले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात तयार होणार्‍या गावठी दारूसाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा मुख्य बाजार हा संपूर्ण दारूबंदी असलेला गुजरात आहे, हे पोलिस तपासातून उघड होऊ लागले आहे. दरम्यान, आतिकला मुंबईच्या न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

मालवणी विषारी दारूकांडातील प्रमुख आरोपी आतिक हा गावठी दारूच्या धंद्यामध्ये अतिशय मोठा विषारी दारू तस्कर मानला जातो. त्याचे देशभरात विषारी दारू तस्करीचे जाळे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. प्रामुख्याने गुजरात, राजस्थान आणि इतर राज्यांतून तो विषारी दारूसाठी लागणार्‍या कच्च्या मालाची तस्करी करत असल्याची बाब समोर आली आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील मोठमोठ्या दारू तस्करांशी आतिकचे लागेबांधे आहेत. विशेषत: वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे असलेल्या गुजरातच्या किनारपट्टीच्या शहरांमधील दारू तस्करांशी त्याचे संबंध होते. खरे तर गुजरातमध्ये संपूर्ण दारूबंदी असूनही मुंबईत येणार्‍या कच्च्या मालापैकी बहुतांश माल गुजरातमधून येतो. तसेच हे गुजराती तस्कर आतिकसारख्या अनेक धंदेवाल्यांच्या माध्यमातून मुंबईसह राजस्थान, काेलकाता आणि देशभर विषारी दारूसाठी लागणार्‍या रसायनांची सर्रास तस्करी करतात. या धंद्यात गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील बडे केमिकल माफिया सामील असल्याचे बोलले जात आहे.

मास्टरमाइंडला राजकीय वरदहस्त
या तस्करीतील मास्टरमाइंड आतिकला याआधीही काही वेळा अटक करण्यात आली होती. त्या वेळी राजकीय दबावापोटी कारवाई होऊ शकली नव्हती. या राजकीय आशीर्वादामुळेच पुढे तो राजरोसपणे विषारी दारूची तस्करी करू लागला. या राजकीय व्यक्तीच्या मदतीने आतिक मुंबईतच नव्हे तर शेजारच्या राज्यांमधल्या पोलिसांच्या कारवाईतूनही सहीसलामत सुटल्याची माहिती पोलिस खात्यातील सूत्रांनी दिली. आतिकला मदत करणारी ती राजकीय व्यक्ती कोण आहे, याचा खुलासाही लवकरच केला जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

जंगले, डोंगर हातभट्टीवाल्यांचे अड्डे
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांमधील किनारपट्टी आणि खाडीकिनारी वसलेल्या परिसरात या हातभट्टीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. अशा ठिकाणांवर भट्ट्या लावल्याने त्या पोलिस कारवाईपासून दूर राहतातच, शिवाय छोट्या बोटींच्या माध्यमातून तिथपर्यंत गावठी दारूसाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा करणेही सोपे जाते. ठाण्यात कळवा, मुंब्रा, डायघर, दिवा, भिवंडी, वसई, विरार या भागांमधील तिवरांची जंगले, ठाण्यातल्या वर्तकनगरच्या पाठीमागचा मामाभाच्याचा डोंगर, येऊर जंगलातील निर्मनुष्य परिसरात अशा हातभट्ट्यांवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. तर मुंबईत मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, ट्राॅम्बे, गोराई यासारख्या भागातील खाडीकिनार्‍यांवर हातभट्ट्यांचे प्रमाण अधिक आहे.

कशी बनते गावठी दारू ?
कुजलेले धान्य, पालापाचोळा, काळा गूळ, नवसागर, साप किंवा पाल अशा विषारी प्राण्यांचे अवयव, कपड्यांच्या डाइंगसाठी वापरली जाणारी रसायने, मिथेनाॅल किंवा स्पिरिट यासारखी रसायने, सेल बॅटरी अशा वस्तू वापरण्यात येतात. मोठमोठ्या लोखंडी पिंपात त्या एकत्र करून कुजवल्या जातात. हा कच्चा माल जेवढा जास्त कुजेल तितकी दारू अधिक कडक. कुजलेला हा माल लोखंडी पिंपातून भट्टीवर तापवला जातो. तयार होणारी वाफ या पिंपाला असलेल्या नळीतून थेंबाथेंबाने एका दुसर्‍या भांड्यात साठवली जाते. हा तयार होणारा द्रव म्हणजे पहिल्या धारेची दारू. ही दारू टायरच्या ट्यूब, फुगे, पाॅलिथीनच्या पिशव्यांमधून शहरभर पुरवली जाते. पुढे अधिक फायदा मिळवण्यासाठी मग यात विविध रसायनांची भेसळही केली जाते.